मनपाचे अडीचशे कोरोना योद्धा मदतीपासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:14 AM2020-12-22T04:14:29+5:302020-12-22T04:14:29+5:30
नाशिक : कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्काळ विमा संरक्षणाची गरज असताना तब्बल त्यावेळी त्यांना मदत मिळालीच नाही ...
नाशिक : कोरोनाच्या काळात जीव धोक्यात घालणाऱ्या कर्मचाऱ्यांना तत्काळ विमा संरक्षणाची गरज असताना तब्बल त्यावेळी त्यांना मदत मिळालीच नाही आणि आता दुसरी लाट येणार किंवा येणार नाही, याची खात्री नसताना आता विम्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. हा विमा लागू झालाच तरी तो या आधी कोरोना होऊन बरे झालेल्यांना त्याचा कोणताही लाभ मिळणे शक्य नाही. त्यामुळे २४६ कर्मचारी अशा मदतीपासून वंचित राहिले आहेत. अत्यावश्यक गोष्टींचे प्रस्ताव बाजूला ठेवून काही राजकीय पदाधिकारी आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांचे स्वारस्याचे विषय तत्काळ मांडून त्यासाठी मोठा खर्चही केला जातो, परंतु आवश्यक त्या कामासाठी मात्र खर्च केला जात नाही. कोरोना काळातील विमा संरक्षणाच्या बाबतीत देखील असेच झाले आहे. कोरोना काळात जेव्हा केवळ शासकीय रूग्णालयेच सुरू होती आणि अंगणवाडी सेविका, सफाई कामगार देखील प्रतिबंधित क्षेत्रात सेवा देण्याचे काम करीत होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढण्याची मागणी होत होती; मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आली. विशेष म्हणजे महापालिकेच्या रूग्णालयात मनपाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी खाटा राखीव असाव्यात अशी देखील मागणी झाली होती. कारण शहरातील खासगी रुग्णालयातील खर्च कर्मचाऱ्यांना परवडणारा नव्हता. अंगणवाडी सेविका तर मानधनावर काम करीत असल्याने त्यांची आर्थिक अवस्था बिकट हेाती. मात्र, त्यानंतरही विमा काढण्याचे काम घेाळात ठेवण्यात आले आणि आताशी कुठे निविदा प्रक्रिया पूर्ण करून हा विषय स्थायी समितीसमोर मांडण्यात आला आहे. महापालिकेच्या १ हजार ४८१ अधिकाऱ्यांचा आणि कर्मचाऱ्यांचा विमा काढण्याचा प्रस्ताव आहे; मात्र त्यानंतर ज्यांना कोरोना संसर्ग होऊन गेला, त्यांच्या मदतीचे काय हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
इन्फो...
हे कोरोना योद्धे राहीले वंचित
सार्वजनिक आरोग्य विभाग- ९२
घनकचरा विभाग- ८८
इतर विभाग ६६
एकूण २४६
इन्फो...
असा आहे नवा प्रस्ताव
महापालिकेच्या १८ ते ४० वयोगटातील ९४५ त्याचप्रमाणे ४१ ते ५० वर्षे वयोगटातील ३२८ आणि ५१ ते ६० वर्षे वयोगटातील २०८ अशा प्रकारे एकूण १ हजार ४८१ अधिकारी कर्मचाऱ्यांचा विमा काढण्यात येणार आहे. प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या विम्यासाठी ३१ लाख ५० हजार रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.