कोरोना राेखण्यासाठी मनपाचा ॲक्शन प्लान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:15 AM2021-03-14T04:15:09+5:302021-03-14T04:15:09+5:30
नाशिक - काेरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, देशपातळीवर ‘टॉप टेन’मध्ये असलेल्या नाशिक शहरात तूर्तास लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला नसला, ...
नाशिक - काेरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, देशपातळीवर ‘टॉप टेन’मध्ये असलेल्या नाशिक शहरात तूर्तास लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला नसला, तरी निर्बंध कडक करण्यात येणार असून, कोरोना चाचण्याही वाढविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये ३० मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक महापालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. शहरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने शुक्रवारी (दि. १३) झालेल्या आढावा बैठकीत मुख्य सचिवांनी एकूणच प्रशासकीय यंत्रणेविषयी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी तातडीने शनिवारी सुट्टी असतानाही बैठक घेतली. या बैठकीला महापालिकेचे सर्व खातेप्रमुख आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
नाशिक शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासह बाधितांचा शोध घेण्यासाठी चाचण्या वाढविण्यात येणार आहेत. कोरोना चाचण्यांचा अहवाल येण्यास होणारा विलंब टाळण्यासाठी बिटको रूग्णालयात लॅबदेखील पंधरा दिवसात कार्यान्वित करण्यात येणार आहे.
बाधित रूग्णांशी संबंधित कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे बाधित असल्याने गृह विलगीकरणात राहून प्रत्यक्षात मुक्त संचार करणारे रूग्ण सुपर स्प्रेडर ठरत असल्याने अशांचा शाेध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. त्यासाठी खास पथकेही तयार करण्यात आली आहेत.
जनतेशी थेट संपर्कात असलेले दुकानदार, त्यांच्याकडील कर्मचारी आणि रिक्षाचालक अशा ५० हजार व्यक्तिंची ॲन्टिजेन चाचणी करण्यात येणार आहे. महापालिकेने यासाठी तातडीने नियंत्रण कक्ष सुरू केला आहे.
इन्फो..
महापालिका आणि पोलीस यंत्रणा एकत्रित आता रस्त्यावर उतरणार असून, नियम भंग करणारे, गर्दी करणाऱ्या सर्वांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. जे कर्मचारी कर्तव्यात कुचराई करतील, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.