मनपाच्या क्रीडा विभागाकडे नाही क्रीडांगणांची यादी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:23 AM2021-02-06T04:23:40+5:302021-02-06T04:23:40+5:30
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या मालकीच्या महानगराच्या हद्दीतील क्रीडांगणांची यादी, तसेच प्रत्यक्ष मनपाच्या ताब्यात असलेल्या क्रीडांगणांची यादी, त्याचप्रमाणे संबंधित ...
नाशिक : नाशिक महानगरपालिकेच्या मालकीच्या महानगराच्या हद्दीतील क्रीडांगणांची यादी, तसेच प्रत्यक्ष मनपाच्या ताब्यात असलेल्या क्रीडांगणांची यादी, त्याचप्रमाणे संबंधित क्रीडांगणांवर मनपाने केलेला खर्च याबाबतची कोणतीही माहिती मनपाच्या क्रीडा विभागाकडे उपलब्ध नसल्याचे धक्कादायक वास्तव उघडकीस आले आहे.
या क्रीडा विभागाकडे मनपाच्या मालकीच्या क्रीडांगणाची यादी उपलब्ध नसेल तर हा विभाग निर्माण कशाला केला, असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. या क्रीडा विभागाचा अतिरिक्त पदभार ना. रोड विभागाचे विभागीय अधिकारी दिलीप मेनकर यांचेकडे सोपविला आहे. त्यामुळे त्यांची भेट मिळणे दुरापास्त आहे. नाशिक मनपाला त्यांच्या मालकीच्या क्रीडांगणाची माहिती नसेल तर हे नाशिककरांचे दुदैव म्हणावे लागेल.
वास्तविक महाराष्ट्र शासनाने ९ मार्च १९९८ च्या निर्णयान्वये मनपाच्या वार्षिक खर्चापैकी ५ टक्के रक्कम क्रीडा क्षेत्रासाठी खर्च करणे बंधनकारक केले आहे. ते केवळ प्रत्येक शहरातील नागरिक, खेळाडू यांना योग्य त्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठीच आहे. मात्र, मनपाच्या कारभाऱ्यांना याबाबत कोणतेही स्वारस्य नसल्याचे दिसून येते. मनपाच्या महासभेने ७ वर्षांपासून मंजूर केलेल्या क्रीडा धोरणाची अंमलबाजवणी करण्यासाठी अद्यापपावेतो कोणतीही कारवाई केल्याचे दिसून आलेले नाही. तसेच मनपाच्या क्रीडा विभागाकडे मनपाच्या मालकीच्या क्रीडांगणाची माहितीच उपलब्ध नसेल तर क्रीडा विभाग कशाच्या आधारे काम करतो की, २९ ऑगस्टला मेजर ध्यानचंद यांची जयंती राष्ट्रीय क्रीडादिन साजरा करण्याचे काम करतो, असा क्रीडाप्रेमींना प्रश्न पडतो.
कोट
माहितीच्या अधिकारात विचारलेली क्रीडांगणांची माहिती ही सार्वजनिक बांधकाम विभाग तसे क्रीडांगणांवर खर्च केल्याची माहिती वित्त विभागाकडे असल्याने या विभागाकडून आपण परस्पर माहिती उपलब्ध करून घ्यावी, असे त्यांनी कळविले आहे. त्यावर कळस म्हणजे मनपाच्या बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी नाशिक पूर्व, पश्चिम, पंचवटी, नाशिक रोड, नवीन नाशिक, सातपूर विभागाच्या उपअभियंत्यांना परस्पर माहिती देण्याबाबत कळविले आहे. त्यावरून असे दिसून येते की, मनपाचा क्रीडा विभाग हा फक्त नावालाच उरला असून, परस्पर टोलवाटोलवीचा हा प्रकार आहे. या कारभाराची तक्रार मनपा आयुक्त कैलास जाधव यांची समक्ष भेट घेऊनदेखील केली आहे.
-अविनाश खैरनार, छत्रपती पुरस्कारप्राप्त क्रीडा संघटक