म्युकरमायकोसिसच्या रुग्णांसाठी मनपाचे दोन ऑपरेशन थिएटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:16 AM2021-05-20T04:16:37+5:302021-05-20T04:16:37+5:30
गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिसचा आजार झाल्याचे आढळले होते. मात्र, त्याच्या ...
गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट आल्यानंतर कोरोनामुक्त झालेल्या अनेकांना ब्लॅक फंगस म्हणजेच म्युकरमायकोसिसचा आजार झाल्याचे आढळले होते. मात्र, त्याच्या कैकपटीने अधिक रुग्ण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आढळले आहेत. या बुरशीजन्य आजाराने डोळे, जबडे, गमवण्याची वेळ आली असून, मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचल्यानंतर रुग्ण दगावण्याचा धेाका अधिक आहे. स्टुरॉईडस आणि अन्य काही इंजेक्श्नचा् मारा केल्याने अशा प्रकारचे आजार होत असून, विशेषत: मधुमेहींना त्याचा संसर्ग अधिक होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच रुग्णांचा या आजाराने मृत्यू झाला आहे. नाशिक शहरात नाक कान घसा, नेत्र रोग, तसेच दंतरोग तज्ज्ञ आणि मेंदूविकार तज्ज्ञांकडे त्यावर उपचार सुरू असले तरी त्याबाबत अधिकृत माहिती महापालिकेकडे नाही. तसेच महापालिकेच्या रुग्णालयात यासंदर्भात उपचार आणि शस्त्रक्रिया करण्याचीदेखील सोय नाही. त्यामुळे आता महापालिकेच्या बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात दोन ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला आहे.
इन्फो...
महापालिकेच्या वतीने समाज कल्याण, मेरी तसेच ठक्कर डोम येथे कोविड केअर सेंटर्स सुरू करण्यात आली होती. यातील रुग्ण संख्या आता कमी होत आहे. त्यामुळे ठक्कर डोम कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सध्या या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुग्ण आहेत. त्यामुळे आता नवीन रुग्ण या ठिकाणी दाखल करण्यात येणार नाही, तसेच देखभाल दुरुस्तीसाठी कोविड सेंटर बंद ठेवण्यात येणार आहे, असे महापालिकेचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नागरगोजे यांनी सांगितले.