बिल्डर लॉबीसाठी नगरसेवकाच्या सुविधा;
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:18 AM2021-09-12T04:18:25+5:302021-09-12T04:18:25+5:30
सातपूर : स्थानिक नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक बिल्डर लॉबीलाच कसा फायदा करून ...
सातपूर : स्थानिक नागरिकांना सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवक बिल्डर लॉबीलाच कसा फायदा करून देता येईल अशी कामे करीत असल्याचा थेट गंभीर आरोप माजी महापौरांच्या पुत्राने महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनाद्वारे केला आहे. त्यामुळे मनपा निवडणूक जवळ आल्याने काका-पुतण्या असा कलगीतुरा रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.
माजी महापौर दशरथ पाटील यांचे पुत्र प्रेम पाटील यांनी महानगरपालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभाग क्रमांक ९ मध्ये पावसाळ्यापूर्वी करण्यात आलेल्या रस्त्यांची कामे अतिशय निकृष्ट दर्जाची झाल्याने रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. जनतेच्या आणि मनपाच्या पैशांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सर्व रस्त्यांची चौकशी करण्यात यावी. तसेच प्रभागातील महापालिकेच्या भूखंडांवर उभारलेल्या मंदिरांना आणि मोकळ्या भूखंडांना स्थानिक नगरसेवकांनी स्वमालकीच्या समजून कब्जा करून कुलूप लावले आहेत, असा अधिकार त्यांना कोणी दिला असा प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केला आहे.
प्रभागात नागरी वस्ती नसलेल्या गंगापूर शिवारातील शिन्दोरी रस्त्याच्या पूर्व बाजूस ‘गाडगी’ म्हणून संबोधल्या जाणाऱ्या भागात केवळ बिल्डरच्या आर्थिक फायद्यासाठी स्थानिक नगरसेवकांनी देवाच्या नावाने चांगभलं म्हणून संत तुकाराम महाराज यांच्या नावाने गार्डन उभारले आहे. बिल्डरच्या लेआउटला भाव मिळवून देण्यासाठी रस्ते, ड्रेनेज यासारख्या सुविधा देण्याचा आटापिटा केला आहे. गार्डनला सोन्याची अंडी देणारी कोंबडी समजून करोडो रुपये खर्च केले आहेत. ही मनपाच्या पैश्यांची सर्रास उधळपट्टी केली आहे. त्याचप्रमाणे गंगापूरगाव ते गोवर्धन या सुला वाईन्सकडे जाणाऱ्या शिवरस्त्यावर एका बिल्डरच्या आर्थिक फायद्यासाठी त्याच्या लेआउटपर्यंत दोन किलोमीटर रस्ता आणि ड्रेनेज लाईन टाकून जनतेच्या पैश्यांची लूट करून महानगरपालिकेचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. अशी अनेक उदाहरणे आहेत.या सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी प्रेम दशरथ पाटील यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. या प्रभागात एक नगरसेवक नगरसेवक दिनकर पाटील हे ही असून, ते प्रेम पाटील यांचे काका आहेत.