तडीपार युवकास आश्रय दिल्याने नगरसेवकावर गुन्हा
By admin | Published: May 26, 2016 10:59 PM2016-05-26T22:59:11+5:302016-05-27T00:22:31+5:30
तडीपार युवकास आश्रय दिल्याने नगरसेवकावर गुन्हा
नाशिकरोड : तडीपार युवकास संपर्क कार्यालयात आश्रय दिल्याच्या कारणावरून नगरसेवक पवन पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस उपआयुक्त श्रीकांत धिवरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. आर. ढोकणे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खैरनार, उपनिरीक्षक बी. एस. गायकवाड व पोलीस कर्मचारी मंगळवारी रात्री जेलरोड परिसरात कोम्बिंग आॅपरेशन व गुन्हेगार तपासणी मोहीम राबवत होते. यावेळी पोलिसांना नगरसेवक पवन पवार यांच्या संपर्क कार्यालयात तडीपार युवक असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलीस पथकाने रात्री सव्वादहा वाजेच्या सुमारास पवार यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता तेथे जेलरोड शिवाजीनगर येथील तडीपार युवक संतोष रमेश कुशारे आढळून आला. त्याच्याकडून पोलिसांनी चॉपर जप्त केले आहे. कुशारे याला २०१४ मध्ये शहर-ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले होते. पोलिसांनी कुशारे याला ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आहे.
तडीपार युवकास आश्रय दिला म्हणून नाशिकरोड पोलीस ठाण्यात नगरसेवक पवन पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आल्याचे धिवरे यांनी सांगितले. पवार यांच्या संपर्क कार्यालयात कुशारे कागदपत्रे साक्षांकन करण्याचे काम करून वास्तव्यास असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)