नगरसेविकेच्या पतीचा बिटको रुग्णालयात धुडगूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:14 AM2021-05-16T04:14:58+5:302021-05-16T04:14:58+5:30

कोरोना बिटको सेंटरमध्ये गेल्या दोन चार दिवसांत रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने समाधानकारक वातावरण पसरलेले आहे. दरम्यान, शनिवारी रात्री पावणेआठ ...

The corporator's husband was rushed to Bitco Hospital | नगरसेविकेच्या पतीचा बिटको रुग्णालयात धुडगूस

नगरसेविकेच्या पतीचा बिटको रुग्णालयात धुडगूस

Next

कोरोना बिटको सेंटरमध्ये गेल्या दोन चार दिवसांत रुग्णांचे प्रमाण कमी झाल्याने समाधानकारक वातावरण पसरलेले आहे. दरम्यान, शनिवारी रात्री पावणेआठ वाजेच्या सुमारास राजेंद्र उर्फ कन्नू ताजणे यांनी कोरोना सेंटरच्या रॅम्पवरून इनोवा कार डायरेक्ट रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराची काच फोडून गाडी थेट रुग्णालयाच्या आतमध्ये नेली. काचेचा दरवाजा फुटल्याने रुग्णालयाच्या आतमध्ये सर्वत्र काचा पसरल्या होत्या. अचानक घडलेल्या या घटनेमुळे व जोरदार आवाज झाल्याने डॉक्टर कर्मचारी रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे प्रचंड घाबरून गेले होते. अचानक घडलेली घटना व कुणालाच आवाजाचे कारण समजत नसल्याने प्रथम काय झाले हे कोणालाच समजत नव्हते. आवाजामुळे दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावरील रुग्ण व त्यांचे नातेवाईक हे सगळे गॅलरीत आले होते. यावेळी ताजने यांनी सर्वांना ऑक्सिजन व्हेंटिलेटर बेड व रेमडेसिविर इंजेक्शन मिळालेच पाहिजे. इंजेक्शनचा काळाबाजार करू नका, असे म्हणत रुग्णालयातून गाडी वळवून घेत आलेल्या मार्गाने निघून गेले. सदर घटना नाशिकरोड पोलिसांना समजताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बिजली व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. नवीन बिटको कोरोना रुग्णालयातील कोविड सेंटरच्या

काचेच्या प्रवेशद्वारातून गाडी आतमध्ये का घातली? सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. ज्यावेळी हा प्रकार घडला त्यावेळी केवळ तीन सुरक्षारक्षकच प्रवेशद्वारावर हजर होते. प्रवेशद्वाराच्या आतमध्ये भिंतीलगत स्‍ट्रेचरवर रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलिंडर ठेवलेले होते. त्या स्‍ट्रेचरचा पाय निखळून पडला. सदर घटनेची माहिती मिळताच महापौर सतीश कुलकर्णी, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी भेट देऊन पाहणी केली. रुग्णालयाच्या आतमध्ये सर्वत्र काचेचा थर पडला असल्याने मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश देणे बंद करून दोन्ही बाजूंचे प्रवेशद्वार येण्या-जाण्यासाठी सुरू करण्यात आले.

कोट- अपुऱ्या मनुष्यबळातही प्रशासन रुग्णांना वाचविण्यासाठी शिकस्त करत असताना सत्ताधाऱ्यांकडून पुरेसे पाठबळ दिले गेले नाही. पालिका रुग्णालयात जिवाची बाजी लावून डॉक्टर व आरोग्य कर्मचारी काम करत असताना अशा पद्धतीने गुंडागिरी करणे निषेधार्थ आहे. भाजप नगरसेविकेच्या पतीला अशा पद्धतीने दहशत माजवणे का भाग पाडले याचाही सत्ताधारी भाजपने विचार केला पाहिजे. गेल्या पाच दिवसांपासून पालिका रुग्णालयात रेमडेसिविर इंजेक्शन नाही. सत्ताधारी भाजपचा हा उन्माद नाशिककर खपवून घेणार नाही. - रंजन ठाकरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस

कोट- ही वेळ आरोग्य विभागाला मदतीची आहे. लोकप्रतिनिधींनी संयम बाळगणे महत्त्वाचे आहे. रेमडेसिविर का मिळाले नाही, त्याबाबत महापालिका व आरोग्य अधिकारी जबाबदार आहेत. स्थायी समितीने २० हजार रेमडेसिविर घेण्यास मंजुरी दिली होती, अजून ते का खरेदी केले नाहीत याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.

- सुधाकर बडगुजर, शिवसेना महानगरप्रमुख

Web Title: The corporator's husband was rushed to Bitco Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.