नगरसेवकांसह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:40 AM2019-04-02T00:40:15+5:302019-04-02T00:40:48+5:30
मालेगाव शहरातील ओवाडीनाला भागात हाडे उकळून चरबी तयार करणाऱ्या पाच कारखान्यांवर रविवारी (दि. ३१) पोलिसांनी छापा टाकल्यानंतर आज पोलीस व महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे तीन कारखान्यांवर कारवाई करीत पवारवाडी पोलिसात माजी नगरसेवकासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांचेकडे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
मालेगाव मध्य : शहरातील ओवाडीनाला भागात हाडे उकळून चरबी तयार करणाऱ्या पाच कारखान्यांवर रविवारी (दि. ३१) पोलिसांनी छापा टाकल्यानंतर आज पोलीस व महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे तीन कारखान्यांवर कारवाई करीत पवारवाडी पोलिसात माजी नगरसेवकासह १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांचेकडे २१ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
रविवारी दुपारी विशेष पोलीस पथकाने हड्डी उकळून चरबी तयार करणारे व जनावरांचे टाकाऊ अवशेष यांचा मोठा साठा असलेले पाच कारखान्यांवर छापा टाकला होता. या कारवाईत पाच जणांसह पाच वाहने व दोन दुचाकी जप्त करण्यात आली होती. रात्री उशिरा पोलिसांनी पंचनामा करीत २१ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेत १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यात एका माजी नगरसेवकाचा समावेश आहे. भिकनखान नूरखान (४५) रा. तारा बिल्डिंग, तनवीर शेख अनिस (१९) रा. पवारवाडी, शेख अतिक शेख मुनाफ (३२) रा. खलील हायस्कूलसमोर, गोल्डननगर व शेख अनिस शेख लुकमान (२७) रा. कमालपुरा यांना ताब्यात घेतले आहे. शेख दाऊद शेख जहागिर, रघु रोकडा, सोहेल, नफीस (पूर्ण नाव माहीत नाही) हे फरार आहेत.
आज दुपारी पोलीस व महापालिका प्रशासनाने संयुक्तपणे कारवाई करीत दोन जेसीबी, तीन डंपर व तीन ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन कारखाने उद्धवस्त केले. उर्वरित दोन कारखान्यांवर उद्या कारवाई करण्यात येणार आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल, उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी मनपाचे अतिक्रमण अधीक्षक राजू खैरनार, प्रभाग अधिकारी किशोर गिडगे, पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील, विशेष पोलीस पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्यासह पोलीस कर्मचारी, मनपाचे अतिक्रमण निर्मूलन पथक, दंगा नियंत्रण दलाचे जवान असा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.
संसर्गजन्य रोग पसरण्याची भीती
कारवाई करण्यात आलेल्या कारखान्यांमध्ये स्वत:च्या फायद्यासाठी जनावरांची हाडे व टाकाऊ अवशेष उकळून त्यापासून चरबी बनविण्यात येत होती. त्यामुळे दुर्गंधी पसरून वातावरण दूषित होत होते. परिसरातील रहिवाशांना याचा त्रास होत होता. या कारखान्यांमुळे संसर्गजन्य रोग पसरून आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर कारवाईमुळे परिसरातील रहिवाशांसह सर्वसामान्य नागरिकांनी स्वागत केले आहे.