महापालिका उद्याने ठीकठाक करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 01:16 AM2018-03-13T01:16:02+5:302018-03-13T01:16:02+5:30
मार्च-एप्रिलमध्ये शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर सुट्यांच्या कालावधीत मुलांना उद्याने खुली होण्याकरीता अगोदर ती नीटनेटकी व ठीकठाक करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उद्यान विभागाला दिले असून ३१ मार्चपर्यंत कार्यवाही न झाल्यास आजवर देखभाल-दुरुस्तीवर झालेला खर्च अधिकाºयांकडून वसूल करण्याचा इशारा दिला आहे.
नाशिक : मार्च-एप्रिलमध्ये शाळांच्या परीक्षा संपल्यानंतर सुट्यांच्या कालावधीत मुलांना उद्याने खुली होण्याकरीता अगोदर ती नीटनेटकी व ठीकठाक करण्याचे आदेश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी उद्यान विभागाला दिले असून ३१ मार्चपर्यंत कार्यवाही न झाल्यास आजवर देखभाल-दुरुस्तीवर झालेला खर्च अधिकाºयांकडून वसूल करण्याचा इशारा दिला आहे. महापालिका हद्दीत सुमारे ४७५ च्या आसपास उद्याने आहेत. मनसेच्या सत्ताकाळात त्यातील सुमारे २९६ उद्याने ही देखभालीसाठी ठेकेदारांना देण्यात आलेली आहेत, तर अनेक उद्याने ही महिला बचत गटांच्या ताब्यात आहेत. शहरातील ठराविक उद्याने सोडली तर बव्हंशी उद्यानांना अवकळा प्राप्त झालेली आहे. बºयाच उद्यानांमधील हिरवळ नाहिशी झालेली आहे तर अनेक ठिकाणी खेळण्यांची मोडतोड झालेली आहे. झाडे-झुडपेही वाढल्याच्या तक्रारी ऐकायला येतात. सध्या महापालिकेने सुरू केलेल्या अॅपवर उद्यानांसबंधीच्या तक्रारींची संख्या वाढती आहे. त्या पार्श्वभूमीवर, आयुक्तांनी त्याबाबत गंभीर दखल घेत येत्या ३१ मार्चपर्यंत सहाही विभागांतील उद्याने ठिकठाक करण्याचे आदेश उद्यान विभागाला दिले आहेत. ज्या ज्या ठेकेदारांकडे उद्याने देखभालीसाठी देण्यात आलेली आहेत, त्यांच्याकडूनच सदर कामे करून घेण्याचे निर्देश देण्यात आले.
माफक अपेक्षा पूर्ण करा
आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (दि.१२) सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक घेतली. यावेळी गेल्या आठ दिवसांतील तक्रारींची माहिती घेण्यात आली. परंतु, केवळ आकडेवारी सादर न करता प्रत्यक्षात तक्रारी कमी कशा होतील, याकडे अधिक लक्ष पुरविण्याचे आदेश आयुक्तांनी दिले.