कोरोगेटेड पॅकेजिंग उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:16 AM2021-05-21T04:16:21+5:302021-05-21T04:16:21+5:30
सातपूर : जगभरातील लॉकडाऊनमुळे कोरोगेटेड पॅकेजिंग उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा (कागदाचा) तुटवडा निर्माण झाल्याने आगाऊ घेतलेल्या ऑर्डर्स पूर्ण होऊ ...
सातपूर : जगभरातील लॉकडाऊनमुळे कोरोगेटेड पॅकेजिंग उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा (कागदाचा) तुटवडा निर्माण झाल्याने आगाऊ घेतलेल्या ऑर्डर्स पूर्ण होऊ शकल्या नाहीत. कागदाची अचानक झालेली दरवाढ मोठ्या उद्योगांनी अमान्य केल्याने अनेक कोरोगेटेड उद्योग नाइलाजास्तव बंद करण्याची वेळ आल्याचे उद्योजकांचे म्हणणे आहे.
मागील वर्षी केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन घोषित केला त्याचवेळी जगातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. त्यामुळे कच्चा माल आयात होऊ शकला नाही. त्याचा मोठा फटका कोरोगेटेड उद्योगाला बसला आहे. कच्चा माल असलेल्या कागदाचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला. लॉकडाऊनच्या काळात कागदाची अचानक ५० ते ९० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्यात आली. त्यामुळे कोरोगेटेड पॅकेजिंग उद्योग संकटात सापडला आहे. आगाऊ घेतलेल्या ऑर्डर्स पूर्ण करण्यासाठी प्रचंड तोटा सहन करावा लागत आहे. ज्या मोठ्या उद्योगांना कोरोगेटेड उद्योग पुरवठा करतात त्यांच्याकडूनही अपेक्षित दर वाढून मिळत नसल्याने दुहेरी कोंडी होत आहे. यामुळे अनेक उद्योग नाइलाजास्तव उद्योजकांना बंद करावे लागत असल्याचे सांगितले जात आहे.
इन्फो==
वाहन, इलेक्ट्रिक वस्तू, इलेक्ट्रॉनिक, फळे, द्राक्षे यांच्या पॅकेजिंगकरिता मोठ्या प्रमाणात कोरोगेटेड बॉक्सचा वापर होतो. जागतिक बाजारात निर्यातही केली जाते. नाशिक जिल्ह्यात या क्षेत्रातील जवळपास दीडशे उद्योग असून दरमहा किमान १५ हजार टन उत्पादन घेतले जाते. दीड हजाराच्या वर कामगार यावर अवलंबून आहेत. त्यांचाही रोजगार संकटात आला आहे.
चौकट===
याच कारणांमुळे वाढले दर
गेल्या वर्षी लॉकडाऊन व त्यानंतरच्या परिस्थितीमुळे कच्चा माल असलेला कागद मिळणे या उद्योगांना जिकिरीचे बनले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यात सध्या द्राक्ष स्ट्रॉबेरीच्या पॅकेजिंगसाठी मोठ्या प्रमाण बॉक्सेसची मागणी आहे. याकरिता अनेक उद्योजकांनी आगाऊ ऑर्डर्स त्यावेळच्या दरात घेतल्या होत्या. मात्र अचानक दीड महिन्यात १८ टक्के दर वाढल्याने याकरिता लागणारा गम ३० टक्क्यांनी, केमिकल १० टक्क्यांनी वाढल्याने कोरोगेटेड बॉक्सचे उत्पादन मूल्य वाढले आहे. परिणामी, मागील दरात ऑर्डर्स तयार करून देणे परवडत नसल्याने उद्योग बंद पडू लागले आहेत. भारतात जरी कागद मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असला तरी त्याची गुणवत्ता त्याप्रमाणात नसल्याने त्याचा वापर शक्यतो कोरोगेटेड निर्मितीत केला जात नाही. यामुळे मोठ्या प्रमाणावर कच्चा माल युरोपमधून आयात होतो. मात्र, कोरोनामुळे शेवटचे प्राधान्य दिल्याने समुद्रमार्गे हा माल येण्यास प्रचंड विलंब होत आहे.
इन्फो ===
सद्य:स्थितीत कोरोगेटेड उद्योगांचे जाळे देशभर पसरले आहे. या उद्योगाला संजीवनी प्राप्त करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून हस्तक्षेप करण्याची गरज आहे. देशातील पेपर मिलमधून ७० टक्के पेपरची निर्यात होते आहे. ते प्रमाण कमी करून तीस टक्क्यांपर्यंत आणल्यास कागदाचा तुटवडा कमी होईल व कच्च्या मालाचा पुरवठा वाटेल. यातून कच्च्या मालाची दरवाढ कमी होऊ शकेल व हे उद्योग पुन्हा सुरळीत होतील.
-राजेंद्र छाजेड, संचालक महावीर इंडस्ट्रीज, नाशिक.