नाशिकरोडला लाचखोर पोलीस गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:13 AM2021-03-14T04:13:58+5:302021-03-14T04:13:58+5:30
नाशिक : अटक न करता वॉरंट रद्द करेपर्यंत वेळ देऊन मदत केल्याच्या मोबादल्यात तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना ...
नाशिक : अटक न करता वॉरंट रद्द करेपर्यंत वेळ देऊन मदत केल्याच्या मोबादल्यात तक्रारदाराकडून दीड हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस नायकास शुक्रवारी (दि.१२) नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या आवारातील जुनी शहर पोलीस लाइनच्या रूम १ मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. अरुण हरी लहाने असे या पोलीस नायकाचे नाव आहे.
अरुण लहाने यांची नेमणूक नाशिकरोड पोलीस ठाण्यात आहे. तक्रारदाराविरुद्ध नाशिकरोड पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याचे दोषारोपपत्र नाशिकरोड न्यायालयात दाखल करण्यात आले असून, खटल्याच्या सुनावणीचे काम सुरू असताना ५ फेब्रुवारीला तक्रारदार खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहिला नाही. त्यामुळे न्यायालयाने तक्रारदाराविरुद्ध अजामीनपत्र वॉरंट काढले. ७ मार्च रोजी तक्रारदाराने न्यायालयामार्फत अजामीनपात्र वॉरंट रद्द करून आणले आहे. वॉरंटची बजावणी करण्याचे काम अरुण लहाने यांच्याकडे आले. त्यांनी अटक न करता वॉरंट रद्द करेपर्यंत वेळ देऊन मदत केल्याच्या मोबादल्यात तक्रारदाराकडे दीड हजार रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार पथकाने सापळा रचून शुक्रवारी (दि.१२) नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या आवारातील जुनी शहर पोलीस लाइनच्या रूम १ मध्ये लाच स्वीकारताना लहाने यास पथकाने अटक केली. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात लहानेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.