कोथिंबीर ३३१ रुपये जुडी; उच्चांकी दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 01:13 AM2019-07-17T01:13:17+5:302019-07-17T01:13:44+5:30
गेल्या महिन्याभरापासून कोथिंबीर शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने दिवसेंदिवस दर वाढत चालले असून, मंगळवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर मालाला ३३ हजार १०० रुपये शेकडा असा हंगामातील व बाजार समितीच्या इतिहासातील उच्चांक बाजारभाव मिळाला आहे.
पंचवटी : गेल्या महिन्याभरापासून कोथिंबीर शेतमालाची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने दिवसेंदिवस दर वाढत चालले असून, मंगळवारी सायंकाळी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेल्या कोथिंबीर मालाला ३३ हजार १०० रुपये शेकडा असा हंगामातील व बाजार समितीच्या इतिहासातील उच्चांक बाजारभाव मिळाला आहे.
काही दिवसांपूर्वी आडत सुरू असताना कोथिंबीर २७ हजार रुपये शेकडा प्रति दराने विक्री झाली होती. मंगळवारी कोथिंबीर जुडीला ३३१ रुपये असा इतिहासातील उच्चांकी तीन आकडी बाजारभाव मिळाला, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. कळवण तालुक्यातील शेतकरी काशीनाथ बाळू कामडी यांनी विक्रीसाठी आणलेल्या प्रति जुडीला ३३१ रुपये, असा बाजारभाव मिळाला. नाशिक बाजार समितीत आडत बंद झाल्यानंतर पहिल्यांदा उच्चांकी बाजारभाव मिळाल्याचे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक चंद्रकांत निकम यांनी सांगितले. कामडी यांनी शिवांजली व्हेजिटेबल कंपनीत कोथिंबीर माल विक्रीसाठी आणला होता. गेल्या काही दिवसांपासून कोथिंबीर प्रति जुडीला शंभर, दीडशे, दोनशे, सव्वादोनशे ते थेट अडीचशे रुपये असा बाजारभाव मिळत आहे. भाव वाढत चालल्याने ग्राहकांना कोथिंबीर घेण्यासाठी कमीत कमी शंभर रुपयांची नोट मोजावी लागत आहे.
शेतकरी आनंदी
उच्चांकी बाजारभाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी आलेला माल दत्तू अपसुंदे या व्यापाºयाने खरेदी केला, तर अन्य व्हेजिटेबल कंपनीत कोथिंबीर दोनशे, सव्वादोनशे, अडीचशे, तीनशे रुपये प्रति जुडी दराने विक्री झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.