निवडणूक खर्च सादर न करणे पडले महागात
By admin | Published: February 1, 2016 09:52 PM2016-02-01T21:52:14+5:302016-02-01T22:00:08+5:30
कारवाई : सिन्नर तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ३५४ उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्या नोटिसा
सिन्नर : ग्रामपंचायत निवडणुका पार पडून आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही निवडणूक खर्च
सादर न करणाऱ्या सिन्नर तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या ३५४ उमेदवारांना जिल्हाधिकाऱ्यांनी नोटिसा बजावल्या आहेत. यात
अनेक ग्रामपंचायत सदस्यांसह
पराभूत उमेदवारांचा समावेश
आहे. बिनविरोध निवडून
आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांनाही निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक असताना त्यांनी
खर्च सादर केला नसल्याचे दिसून येते. बिनविरोध, विजयी व पराभूत अशा ३५४ उमेदवारांना खर्च
सादर न केल्याने कारवाईला सामोरे जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात एप्रिल महिन्यात ९८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका पार पडल्या. त्यात १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या. सरदवाडी, आटकवडे, मऱ्हळ खुर्द, धुळवड, पिंपळगाव, श्रीरामपूर, धोंडबार, खंबाळे, पाटोळे,
चापडगाव, दहीवाडी, रामपूर, ब्राह्मणवाडे, धोंडवीरनगर, रामनगर, वडगाव-सिन्नर, निमगाव-देवपूर
व दातली या १८ ग्रामपंचायतींसाठी १४७ सदस्य बिनविरोध निवडून
गेले होते. उर्वरित ८० ग्रामपंचायतींच्या ५७० सदस्य निवडीसाठी
मतदान प्रक्रिया राबविण्यात आली होती.
२२ एप्रिल २०१५ रोजी मतदान पार पडले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी मतमोजणी झाली होती. मतमोजणीनंतर पराभूत व
विजयी अशा सर्व उमेदवारांना ३० दिवसांच्या आत विहित नमुन्यात शपथपत्रासह निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक होते. मात्र एकूण उमेदवार व बिनविरोध निवडणूक आलेल्या सदस्य अशा ३५४ उमेदवारांनी अद्यापपर्यंत निवडणूक खर्च सादर केले नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील ग्रामपंचायत विभागाने ३५४ उमेदवारांना
कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. (वार्ताहर)