निफाड तालुक्यात पावसाअभावी पिके करपली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 03:49 PM2018-09-21T15:49:19+5:302018-09-21T15:49:54+5:30
शेतकरी हवालदिल : पंचनामे करण्याची मागणी
सायखेडा : निफाड तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील पिके करपून गेली असून या पिकांचा पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी तळवाडे, महाजनपुर, पिंपळगाव निपाणी, बागलवाडी,औरंगपूर या गावातील शेतक-यांनी केली आहे. यासंदर्भात शेतक-यांनी निफाड तहसील कार्यालयाला नवेदन दिले आहे.
निफाड तालुक्याच्या दक्षिण भागातील सदर गावे कमी पर्जन्य छायेत येतात. आणेवारी ५० पैसे पेक्षा कमी असते. वर्षानुवर्षे दुष्काळ परिस्थितीमुळे या भागातील शेतकरी पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे. पाऊस कमी आणि सिंचनाच्या सोयी उपलब्ध नसल्याने जमीन असूनही पाण्याअभावी पिके घेता येत नाही. त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे. त्यांना दिलासा म्हणून पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जून महिन्यात जेमतेम पाऊस पडल्यानंतर पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे पिके पूर्णपणे सुकून गेली आहेत. सोयाबीन, मका, टमाटे, कोबी, फ्लॉवर, भाजीपाला यासारखी नगदी पिके शेतात मोठया प्रमाणावर भांडवली खर्च करून शेतक-यांनी उभी केली. एकरी ६० ते ७० हजार रु पये खर्च करूनही पिके हाती येत नसल्याची परिस्थिती आहे. दरम्यान, यासंदर्भात निफाडचे तहसीलदार दीपक पाटील यांना निवेदन सादर करण्यासाठी शेतकरी गेले असता तहसीलदार उपस्थित नसल्याने कार्यालयात लिपिकांकडे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सरपंच लता सांगळे, माजी सरपंच राजेंद्र सांगळे, बचवंत फड, देविदास खाडे, जयराम सांगळे, संदीप फड ,भाऊसाहेब फड यासह शेतकरी उपस्थित होते
नुकसान भरपाई द्यावी
तळवाडे ,महाजनपुर, निपाणी पिंपळगाव या भागातील नगदी पिके पाण्याअभावी करपून गेल्याने भांडवल वाया गेले आहे. त्यामुळे शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी.
- राजेंद्र सांगळे, तळवाडे