स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राष्टवादीची आज घोषणा शक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 01:19 AM2018-04-29T01:19:31+5:302018-04-29T01:19:31+5:30
विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना वगळता भाजपा व राष्टÑवादी आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा न झाल्याने इच्छुकांची घालमेल वाढली असून, विशेषत: भाजपाने शिवसेनेला एकतर्फी पाठिंबा दिला तर पुढे काय असा प्रश्न भाजपाच्या इच्छुकांना पडला आहे. दुसरीकडे राष्टÑवादीच्या पक्षांतर्गत निवडणुका सुरू असल्यामुळे उमेदवार घोषित करण्यात येणारी अडचण रविवारी संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना वगळता भाजपा व राष्टÑवादी आघाडीच्या उमेदवाराच्या नावाची घोषणा न झाल्याने इच्छुकांची घालमेल वाढली असून, विशेषत: भाजपाने शिवसेनेला एकतर्फी पाठिंबा दिला तर पुढे काय असा प्रश्न भाजपाच्या इच्छुकांना पडला आहे. दुसरीकडे राष्टÑवादीच्या पक्षांतर्गत निवडणुका सुरू असल्यामुळे उमेदवार घोषित करण्यात येणारी अडचण रविवारी संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विधान परिषदेच्या नाशिकच्या जागेवर शिवसेनेने सर्वात आधी नरेंद्र दराडे यांच्या नावाची घोषणा करून बाजी मारली आहे. शिवसेनेच्या खालोखाल संख्याबळ असलेल्या भाजपाने याबाबत सोयीस्कर मौन पाळले असून, भाजपा ही जागा लढवणार की नाही याचाही स्पष्ट उलगडा पक्षाकडून होऊ शकला नसला तरी, उमेदवारीसाठी भेटणाऱ्या इच्छुकांना भेटीदेखील नाकारल्या जात नसल्याने इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींची मूक संमती समजून व्यक्तिगत पातळीवर प्रचाराला सुरुवातही केली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे दोनच दिवस बाकी असतानाही पक्षाकडून अधिकृत काहीच निरोप येत नसल्यामुळे ते पण आता संभ्रमात सापडले आहेत. लोकसभेच्या व विधानसभेच्या पोटनिवडणुका पाहता त्या भाजपासाठी प्रतिष्ठेच्या ठरल्या आहेत. या निवडणुका म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणूनच त्याकडे पाहिले जाणार असल्याने भाजपाला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेशी युतीची गरज आहे. भाजपाने नाशिकच्या विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेनेला एकतर्फी पाठिंबा घोषित करून निवडणुकीतून माघार घेतली तर इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरले जाण्याची शक्यताही नाकारता येत नसल्याचे बोलले जात आहे. भाजपाच्या उमेदवारीची अपेक्षा बाळगून असलेल्या परवेज कोकणी यांनी व्यक्तिगत पातळीवर मतदारांच्या भेटीगाठी सुरू केल्या, परंतु ही निवडणूक ‘सर्वार्थाने’ प्रेरित असल्याने पक्षाने उमेदवारी दिल्याशिवाय मतदारांशी ‘जवळीकता’ करणे परवडणारे नाही याचा विचारही केला जात आहे. राष्टवादीकडून अशोक सावंत यांचे नाव घेतले जात असले तरी, त्यांच्या राजकीय वाटचालीचा विचार करता ते अखेरपर्यंत निवडणुकीच्या मैदानात टिकण्याविषयी शंका घेतली जात आहे. मात्र सावंत यांनी पक्षाच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. पक्षांतर्गत निवडणूक सुरू असल्याने सारे प्रमुख पदाधिकारी गुंतल्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकीकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. रविवारी दुपारनंतर राष्टÑवादीची कोंडी फुटण्याची शक्यता आहे.
शिवाजी सहाणे सर्वपक्षीय उमेदवार?
विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने हकालपट्टी केलेले शिवाजी सहाणे यांनी कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक लढविण्याचा ठाम निर्धार केला असून, त्यासाठी राजकीय पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी त्यांची धावपळ सुरू आहे. मध्यंतरी त्यांनी राष्टÑवादीकडून चाचपणी करून पाहिली, परंतु फारसा प्रतिसाद दोन्ही बाजूंकडून न मिळाल्याने आता त्यांनी शिवसेना वगळता अन्य पक्षांनी आपल्याला पाठिंबा द्यावा व सर्वपक्षीय उमेदवारी करावी, असा प्रस्ताव दिला आहे. दुसरीकडे शिवेंद्रराजे भोसले यांच्या मध्यस्थीने भाजपाकडून उमेदवारीसाठीही जोरदार फिल्डिंग लावली आहे.