पश्चिम भारतातील स्त्रीरोगतज्ज्ञांची परिषद
By admin | Published: September 10, 2014 09:35 PM2014-09-10T21:35:44+5:302014-09-11T00:28:01+5:30
पश्चिम भारतातील स्त्रीरोगतज्ज्ञांची परिषद
नाशिक : प्रसूतीदरम्यान व प्रसूतीनंतर उद्भवणाऱ्या समस्या, वंध्यत्व त्याचप्रमाणे अन्य स्त्रीरोगांविषयी व त्यावरील आधुनिक उपचारपद्धती आणि विकसित तंत्रज्ञानाची नवोदित स्त्रीरोगतज्ज्ञांना माहिती व्हावी आणि जेणेकरून त्यांचे ज्ञान अद्ययावत व्हावे यासाठी पश्चिम भारतामधील स्त्रीरोगतज्ज्ञांची तीनदिवसीय परिषद नाशिकमध्ये होणार असल्याची माहिती आयोजन समितीच्या अध्यक्ष डॉ. विजयालक्ष्मी गणोरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.
देशामधील महिलांचे आरोग्य निरामय राहावे या उद्देशाने फेडरेशन आॅफ आॅबस्ट्रॅक्टीस अॅण्ड गायनेकोलॉजिकल सोसायटी आॅफ इंडिया अर्थात फॉग्सीच्या नेतृत्वाखाली शहर स्त्रीरोगतज्ज्ञ सोसायटीच्या वतीने तीनदिवसीय ‘वेस्ट झोन युवा फॉग्सी’ या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या शुक्रवारी (दि. १२) संध्याकाळी ६ वाजता परिषदेचे उद्घाटन राज्याच्या आरोग्य विभागाच्या सचिव सुजाता सौनिक यांच्या हस्ते होणार आहे. फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सुचित्रा पंडित यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. पाटणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ परिषदेच्या अखेरच्या दिवशी दुपारच्या सत्रात हैदराबाद येथील डॉ. अेविटा फर्नांडिस या प्रसूतितज्ज्ञांचे विशेष व्याख्यान होणार आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ व गोवा या सहा राज्यांमधील एकूण सातशेपेक्षा अधिक स्त्रीरोगतज्ज्ञ उपस्थित राहणार असल्याची माहिती सचिव डॉ. चंद्रकांत संकलेचा यांनी यावेळी दिली. येत्या गुरुवारपासून (दि. ११) शंकराचार्य संकुलात मोफत युवा मेळा व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)