मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे काउंटडाउन सुरू

By admin | Published: June 19, 2017 12:15 AM2017-06-19T00:15:43+5:302017-06-19T00:16:35+5:30

नाशिकमध्ये राज्यस्तरीय बैठक : ९ आॅगस्ट रोजी मोर्चाची तयारी

Countdown to Maratha Kranti Morcha in Mumbai | मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे काउंटडाउन सुरू

मुंबईतील मराठा क्रांती मोर्चाचे काउंटडाउन सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कार प्रकरणानंतर रस्त्यावर उतरलेल्या मराठा समाजाने
पीडित मुलीला न्याय मिळवून देण्यासह अन्य विविध मागण्यांसाठी राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून मराठा क्रांती मोर्चा काढल्यानंतर आता मराठा समाजातर्फे मुंबईत ९ आॅगस्ट रोजी मोर्चा काढण्याची तयारी सुरू करण्यात आली असून, मुंबईतील मराठा क्रांती मोर्चासाठी आता ५० दिवसच उरल्याने या मोर्चाचे काउंटडाउन सुरू झाले आहे.
नाशिक येथील रुक्मिणी लॉन्स येथे आयोजित मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत या मोर्चाचा प्राथमिक नियोजन आराखडा मांडण्यात आला. आराखड्याविषयी मुंबई पोलिसांसोबत बैठक झाल्यानंतर २५ जुलैला मुंबईत बैठक घेऊन संपूर्ण राज्यभरातून येणाऱ्या मराठा समाजाच्या मोर्चेकऱ्यांना मुंबईत येण्यासाठीचे नियोजन पोहोचविण्याचा निर्णय नाशिकच्या बैठकीत घेण्यात आला. औरंगाबादरोड परिसरातील रुक्मिणी लॉन्स येथे रविवारी (दि.१८) आयोजित मराठा क्रांती मोर्चाच्या राज्यस्तरीय बैठकीत मुंबईत आॅगस्ट क्रांतीदिनाच्या पार्श्वभूमीवर ९ आॅगस्टला काढण्यात येणाऱ्या मोर्चाचे नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली. यावेळी राज्यभरातील औरंगाबाद, जळगाव, अहमदनगर, पुणे, अमरावती, नागपूर, बुलडाणा, जालना, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सातारा रत्नागिरी, रायगड सिंधुदुर्ग, धुळे आदि विविध जिल्ह्णांमधील वेगवेगळ्या मराठा संघटनांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेत यापूर्वी काढण्यात आलेल्या मराठा मोर्चात करण्यात आलेल्या नियोजनाविषयी सांगतानाच मुंबईतील मोर्चासाठी काय व कसे नियोजन करावे यासाठी मत मांडले. तसेच काही संघटनांनी मराठा समाजाने आपल्या मागण्यांविषयी फेरविचार करून नव्याने मोजक्याच मागण्या सरकारसमोर मांडण्याचा प्रस्ताव मांडला. परंतु, अन्य संघटनांनी बहुमताने मराठा समाजाच्या सर्व प्रमुख मागण्यांसह मुंबईत ‘न भूतो न भविष्यती’ असा ऐतिहासिक मोर्चा काढण्याचा निर्धार केला आहे.
मोर्चाचे सूक्ष्म नियोजन होणार
राज्यभरातून मराठा समाजाचे आंदोलक मुंबईतील मोर्चात सहभागी होणार असल्याने महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची सोय करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शाळा, महाविद्यालये व नगरपालिकेची मैदाने उपलब्ध करून घेण्याची आवश्यकता बैठकीत करण्यात आली. तसेच मुंबईतील मराठा समाजाच्या कु टुंबीयांनी त्यांच्या गावातून आणि परिसरातून मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांनीच सोय शक्यतो आपल्या घरीच करावी, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी त्यांना दोन दिवस आगोदरच मुंबईतील नातेवाइकांकडे पाठविण्याविषयीही या बैठकीत चर्चा करण्यात आली.
रेल्वे आरक्षणाचे नियोजन
राज्यभरातील मराठा समाजाच्या नागरिकांना मोर्चात सहभागी होण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्णातून रेल्वे आरक्षण करण्याविषयीही बैठकीत चर्चा झाली. यावेळी जालना जिल्ह्णातील प्रतिनिधींनी जिल्ह्णातून मोर्चात सहभागी होणाऱ्या मराठा समाजाच्या आंदोलकांसाठी एक संपूर्ण रेल्वेगाडीचे आरक्षण करण्याची तयारी दाखविली. त्यांच्या या सूचनेला बहुतांश जिल्ह्णांतील प्रतिनिधींनी समर्थन देत रेल्वेचे आरक्षण करून मोर्चेकऱ्यांना मुंबईत येण्यासाठी सोय करण्यासाठी सहमती दर्शविली.
मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीतील ठराव
* राज्यभरातील मराठा संघटनांच्या सहभागातून कोपर्डीत १३ जुलैला कॅण्डलमार्च काढणे.
* राज्यभरात २४ जून रोजी एकाचवेळी जिल्हास्तरीय बैठक घेऊन मुंबईच्या मोर्चाचे नियोजन करणे.
*मुंबईत २५ जून रोजी नियोजन बैठक घेऊन मोर्चाचा सविस्तर कार्यक्रम जाहीर करणे.
* मराठा क्रांती मोर्चाचे नावाचा वापर कोणीही वैयक्तिक स्वार्थासाठी करू नये.
* गाव, तालुका, जिल्हास्तरावर समित्या स्थापन करून विभागवार निरीक्षकांच्या माध्यमातून प्रत्येक तीन दिवसांनी मोर्चाच्या तयारीचा आढावा घेणे.
* प्रत्येक जिल्ह्णाची कोर कमिटी स्थापन करणे, या कोर कमिट्यांनी मोर्चाच्या तीन दिवस आधी मुंबईत जाऊन जिल्ह्णातून येणाऱ्या वाहनांचे, मोर्चेकऱ्यांच्या निवासाचे जिल्हावार नियोजन करणे.
* राज्यभरातून मुंबईत येणाऱ्या वाहनांचे नियोजन करण्यासाठी वाहतूक समिती स्थापन करणे, या समितीने वाहनचालकांना मार्गदर्शनासह पार्किंगसाठी मदत करणे.
* महिलांच्या सोयीसाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन करणे, या समितीने मुंबईत महिलांच्या स्वच्छतागृहांसाठी व निवासस्थानासाठी मदत करणे.
* मराठा मोर्चासाठी राज्यभरातून येणाऱ्या मराठा समाजबांधवांच्या जनजागृतीसाठी एकाचप्रकारचे फलक, झेंडे, पत्रके, पोस्टर्सचे नियोजन करणे.
* मराठा आरक्षणासाठी न्यायालयीन लढा देण्यासाठी राज्यस्तरावर १० तज्ज्ञ वकिलांची उच्चस्तरीय समिती नेमणे.
* ग्रामीण भागातील मराठा क्रांती मोर्चाच्या प्रतिनिधींनी मुंबईतील मराठा समाजबांधवांच्या जनजागृतीसाठी दोन ते तीन दिवस आधी जाऊन जनजागृती करणे.
* मुंबईत होणाऱ्या मोर्चाचे नियोजन करण्यासाठी व मराठा समाजाच्या मागण्या सरकारसमोर मांडण्यासाठी राज्यस्तरीय समितीची स्थापना करणे.
* या समितीत राज्यभरातील विविध मराठा संघटनांचे प्रमुख व जिल्हास्तरावरील तीन सदस्यांना समाविष्ट करणे.
मुंबईत ९ आॅगस्टला काढण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय मराठा क्रांती मोर्चाच्या प्राथमिक नियोजनाचा आराखडा प्रसिद्ध करताना विविध मराठा संघटनांचे प्रतिनिधी. नाशिककडे लक्ष राज्यातील शेतकऱ्यांनी कर्जमाफी व शेतमालाला हमीभावासाठी पुकारलेल्या संपात फूट पडल्यानंतर नाशिकमधून शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आंदोलनाला पुन्हा उभारी देऊन आंदोलन उभे करून यशस्वी केले. त्यामुळे राज्यभराचे लक्ष नाशिक जिल्ह्याकडे लागलेले असताना मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याने राज्याचे लक्ष वेधून घेतले असून, कुंभभूमी म्हणून असलेली नाशिकची ओळख आता क्रांतिकारी चळवळींना दिशा देणारी भूमी म्हणूनही समोर येत आहे.

Web Title: Countdown to Maratha Kranti Morcha in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.