मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 12:57 AM2019-05-18T00:57:18+5:302019-05-18T00:57:41+5:30
गेल्या दीड महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामात व्यस्त असलेल्या महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सुटकेचा श्वास घेऊन कुटुंबासह उन्हाळी सुटी घालविण्यासाठी रजा टाकून जाणे पसंत केल्याची बाब निवडणूक यंत्रणेला खटकली
नाशिक : गेल्या दीड महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या प्रशासकीय कामात व्यस्त असलेल्या महसूल कर्मचारी, अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे मतदान पार पडल्यानंतर सुटकेचा श्वास घेऊन कुटुंबासह उन्हाळी सुटी घालविण्यासाठी रजा टाकून जाणे पसंत केल्याची बाब निवडणूक यंत्रणेला खटकली असून, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया २७ मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश असल्याचे सांगून निवडणुकीशी संबंधित महसूल अधिकारी, कर्मचाºयांना कोणत्याही प्रकारच्या रजा मंजुरीवर मज्जाव घालण्यात आला आहे.
या संदर्भात दोन दिवसांपूर्वीच उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, अतिरिक्तसहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांना पत्र पाठवून आयोगाच्या पत्राची जाणीव करून दिली आहे.
लोकसभा निवडणुकीचे मतदान २९ एप्रिल रोजी पार पडल्यानंतर या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करण्यापासून ते मतदार यादी तयार करणे, मतदारांपर्यंत ओळखपत्र, निवडणूक चिठ्या पोहोचविण्यापर्यंत त्याचबरोबर मतदान केंद्राची सर्व तयारी करण्यात महसूल अधिकारी व कर्मचारी गेल्या दीड महिन्यांपासून गुंतून पडले होते. या काळात त्यांना साप्ताहिक सुटी अथवा घोषित झालेल्या शासकीय सुट्याही घेणे अवघड होऊन बसले होते. निवडणूक कामाला प्राधान्य देण्याचे आयोगाचे आदेश असल्याने महसूल अधिकारी, कर्मचाºयांनी लोकसभा निवडणूक यशस्वीरीत्या पार पाडली.
मतदानाच्या दिवशी व दुसºया दिवशी सलग ४८ तास काम केलेल्या या अधिकारी, कर्मचाºयांनी निवडणूक आटोपल्यानंतर मात्र थकवा घालविण्यासाठी कुटुंबीयांसह बाहेरगावी जाण्याची तयारी करून मुख्यालय सोडण्याची परवानगीही घेतली, तर काहींनी नातेवाइकांच्या लग्न समारंभासाठी सुट्या टाकल्या. परंतु, त्यांच्या सुटीवर जाण्याने निवडणूक संदर्भातील कामे खोळंबू लागल्याचे निदर्शनास आले आहे.
आयोगाकडून मतदान व मतमोजणी संदर्भातील कोणतीही माहिती तत्काळ मागविली जात असून, संबंधित अधिकारी, कर्मचारी रजेवर गेल्यामुळे माहिती मिळत नसल्याने अडचण निर्माण होत असल्याचे पाहून यापुढे उप जिल्हा निवडणूक अधिकाºयांची पूर्व परवानगीशिवाय निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निवडणूक कामाशी नियुक्त केलेले नायब तहसीलदार, लिपिक यांच्या रजा मंजूर करण्यात येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. निवडणूक यंत्रणेच्या या सूचनेमुळे रजेवर गेलेल्या अधिकारी, कर्मचाºयांना परत बोलविण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.