हुतात्मा स्मारकाजवळच ‘देशीचा’ बार
By admin | Published: December 10, 2015 12:01 AM2015-12-10T00:01:31+5:302015-12-10T00:02:09+5:30
हुतात्मा स्मारकाजवळच ‘देशीचा’ बार
नाशिक : पेठ नगरपंचायत हद्दीतील हुतात्मा स्मारकापासून अवघ्या ५० फुटांच्या अंतरावर आणि एका खासगी शाळेला लागून एका खासगी जागेत देशी दारू दुकान सुरू करण्यासाठी संगनमत करण्यात येत असून, त्यास नगरपंचायत हद्दीतील ग्रामस्थांचा तीव्र विरोध असल्याचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेठ नगरपंचायत हद्दीतील तत्कालीन पेठ ग्रामपंचायतीने केलेल्या ठरावाच्या आधारे प्लॉट क्रमांक २९० मध्ये देशी दारू दुकान सुरू करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी पेठ ग्रामपंचायतीने केलेल्या २६ जानेवारी २०१४ च्या ठरावाचा आधार घेतला जात आहे. मुळातच त्या जागेवर देशी दारूचे दुकान सुरू करण्यास ग्रामसभांमधून वेळोवेळी विरोध करण्यात आलेला आहे. परंतु संबंधित व्यक्ती गटविकास अधिकारी यांच्याशी संगनमत करून कायद्याच्या पळवाटा काढून त्याचजागेवर देशी दारूचे दुकान सुरू करू पाहत आहे. मुळातच या जागेपासून पेठ येथील अतिप्राचीन हुतात्मा स्मारक असून, प्रस्तावित देशी दारू दुकानालगतच तुळजाभवनी प्राथमिक विद्यामंदिर आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंतचे जवळपास ७० ते ८० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यामुळे देशी दारूचे दुकान सुरू झाल्यास त्याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांवर होण्याची शक्यता आहे. तसेच या प्रस्तावित देशी दारू दुकानासाठी या शाळेचे स्थलांतरही करण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांचाही या देशी दारू दुकानास विरोध आहे. त्यामुळेच हुतात्मा स्मारक व प्राथमिक शाळा यांचे महत्त्व लक्षात घेऊन येथे देशी दारू दुकान सुरू करण्यात येऊ नये, अन्यथा आम्ही आमरण उपोषण करू, असा इशारा रख्मा पवार, कुसुम गांगुर्डे, यमुना इंपाळ, सुगंधाबाई अहिरे, हिराबाई वाघमारे, निर्मला इंपाळ, फुलाबाई मोरे, जना सातपुते, कुसुम गायकवाड, रेखा वाघ, मीराबाई राऊत, सुरेखा वाघमारे, कविता मोरे, गंगुबाई पवार, गणपत मोरे, भास्कर सातपुते, हिरामण गायकवाड, हिरामण राऊत यांच्यासह असंख्य ग्रामस्थांनी दिला आहे. (प्रतिनिधी)