‘भाषा मरता देशही मरतो...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 10:40 PM2019-04-21T22:40:16+5:302019-04-21T22:40:54+5:30
भाषिक अस्मिता आणि ज्ञाननिर्मितीक्षमता यांचे महत्त्व मराठी भाषकांना पटवून देण्याची वेळ आली आहे. ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे’ ही कवी कुसुमाग्रजांची इषारावजा भाष्ये आपण ध्यानात घ्यावीत, अशी माझी धारणा आहे.
मराठीतील व्यासंगी समीक्षक व चिंतनशील साहित्यिक प्रा. डॉ. एकनाथ पगार यांची शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे सदस्य म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्याशी साधलेला संवाद...
उच्च शिक्षणात मराठीच्या स्थितीबद्दलच्या आपल्या कोणत्या धारणा आहेत?
- उच्च शिक्षणात विविध ज्ञानशाखांमध्ये मराठीचे अभ्यासक्रम असले पाहिजेत. मराठीच्या परंपरागत अभ्यासक्रमांच्या जोडीला व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची सक्षम जोडही मिळाली पाहिजे. भाषिक अस्मिता आणि ज्ञाननिर्मितीक्षमता यांचे महत्त्व मराठी भाषकांना पटवून देण्याची वेळ आली आहे. ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे’ ही कवी कुसुमाग्रजांची इषारावजा भाष्ये आपण ध्यानात घ्यावीत, अशी माझी धारणा आहे.
समकालीन मराठी साहित्यात नवता जाणवते का? या प्रवाहाबद्दल आपले मत काय?
- सध्याचा काळ हा अस्वस्थतेचा, भयव्याकुळतेचा आणि विलगीकरणाचा काळ असा जाणवत आहे. अस्वस्थतेतून विवेकाच्या मार्गाने, संवेदनशीलतेतून आजचे वास्तव - अतिवास्तव आणि भ्रामक वास्तव मांडले जात आहे. मानुषनेच्या मूल्यांचा शोध घेणारे साहित्य स्वातंत्र्य, समता आणि बंधुतेवरील आघातांचा सर्जनशील कृतींमधून प्रतिवाद करीत आहे, ही चांगली गोष्ट आहे. उपरोध आणि रूपकप्रक्रिया यांनाही महत्त्व आले आहे. जागतिकीकरणाच्या प्रक्रियेने बोलीभाषा-देशीभाषा यांच्या अस्तित्वावर आघात केले असताना मराठीच्या विविध बोलींचे अविष्कार साहित्याून जोमदार पणे होत आहेत. कृष्णात खोत, किरण गुरव आणि प्रसाद कुमठेकर यांच्या कथनात्मक साहित्यात बोलींचे जिवंतपण दिलासादायक वाटत आहे. बहुसांस्कृतिक, बहुभाषिक अशी स्थिती असताना एकसाची परिस्थिती निर्माण करण्याच्या प्रयत्नांना समकालीन मराठी साहित्य विविध स्तरीय बहुअर्थकता धारण करीत आहे. ही अभिव्यक्ती विविध बोली आणि संस्कृतीसमूहांना सामावून घेत आहे, असे माझे निरीक्षण आहे. माहितीपर आणि सुखाची हमी देणाऱ्या साहित्याचा ओघ आता मंदावला आहे, भाषांतरांना बरे दिवस आले असावेत. आपल्या ‘कळ’ आणि ‘कळा’ यांना बोथटपणा आला की भाषांतरांचा आश्रय करावा लागत असावा. जाणिवांचा विस्तार होण्यासाठी भाषांतरे महत्त्वाची ठरतात.
मराठी भाषा सल्लागार समितीच्या माध्यमातून कोणते काम उभे राहू शकते?
- शासन व्यवहारात राजभाषा मराठीचा सक्षमपणे वापर करणे व त्याकरिता विविध विषयांचे परिभाषा कोश तयार करणे या उद्देशाने १९६१ मध्ये भाषा सल्लागार मंडळाची स्थापना झाली आहे. भाषाभिवृद्धीसाठी नवे उपाय सुचवताना विविध ज्ञानक्षेत्रातील परिभाषा कोशांची निर्मिती झाली आहे. आयुर्वेद, सागरविज्ञान, संगणकशास्त्र, पर्यावरणशास्त्र अशा ज्ञानक्षेत्रांसाठी परिभाषा कोशांची निर्मिती प्रगतीपथावर आहे. लोकभाषा मराठी ज्ञानभाषा व्हावी आणि प्रशासन व्यवहारातही परिणामकारक-लोकस्नेही वापर वाढावा. भाषा धोरणाची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि मराठीभाषेचे स्वतंत्र विद्यापीठ असावे, यासाठी भाषा सल्लागार समितीने प्रयत्नरत राहावे. मराठीच्या बोलींचे संवर्धन व्हावे, अस्तित्व टिकावे म्हणूनही या समितीने पुढाकार घ्यावा. ज्ञानक्षेत्र-प्रशासन आणि वित्तव्यवहारात मराठीचे अस्तित्व सक्षम व्हावे, ही निकड खरे तर सर्व मराठी भाषकांना वाटली पाहिजे, अशी निकड या समितीने लक्षात आणून द्यावी.
सयाजीराव गायकवाड यांच्यावरील बारा खंडांच्या माध्यमातून हे साहित्य नव्याने वाचकांपुढे आणण्यामागे शासनाचा हेतू काय?
- महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्र साधने प्रकाशन समिती स्थापन केली. प्रसिद्ध लेखक आणि सयाजीराव महाराजांच्या कार्याचे संशोधक बाबा भांड हे या समितीचे सचिव आहेत. महत्त्वाचे म्हणजे हे काम केवळ बारा खंडांपुरते मर्यादित नाही. यातील पत्रसंग्रहांचे संपादन मी केले आहे. सयाजीराव महाराज हे प्रजेच्या कल्याणात मोक्ष शोधणारे प्रजाहितदक्ष राजे होते. कर्झनशाहीला तीव्र विरोध करणारे राष्ट्रवादी संस्थानिक होते. या स्वाभिमानी महाराजांनी आधुनिकतावादी आणि लोककेंद्री विचार-कृती केल्या आहेत. शेती, प्रशासन राज्यव्यवहार, शिक्षण, ज्ञाननिर्मिती, वास्तुचित्रशिल्पादी कला देशीभाषा, वाङ्मय, प्रकाशन, सहकार, धर्म-संस्कृती, मानववंश शास्त्र-तत्त्वज्ञान अशा विविध क्षेत्रांना आपल्या लेखन-भाषण चिंतनांमधून सौंदर्यपूर्ण आकार दिला आहे. विद्याव्यासंगदर्शक कितीतरी कृती-उक्ती आजच्या काळात मार्गदर्शक ठरू शकतील. सामाजिक धार्मिक सांस्कृतिक राजकीय आणि शैक्षणिक विकासाच्या या अस्सल आणि प्रेरक दस्तऐवजांचा लाभ आजच्या पिढीने घ्यावा ही धारणा या साहित्याच्या प्रकाशनामागे आहे.
- शब्दांकन : संजय वाघ