सराईत गुन्हेगारांनी दाम्पत्यास मारहाण करत लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 16:05 IST2021-08-02T16:00:36+5:302021-08-02T16:05:57+5:30
पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी अन्य पोलीस ठाण्यातून आल्याने त्यांना हद्दीची देखील व्यवस्थित माहिती नाही अनेक सराईत गुन्हेगार तडीपार आरोपी बिनधास्तपणे पंचवटीत वास्तव्य....

सराईत गुन्हेगारांनी दाम्पत्यास मारहाण करत लुटले
नाशिक : जुने नाशिकमधील परिसरात राहणाऱ्या एका युवकाच्या चारचाकी वाहनाची काच फोडून त्यास बेदम मारहाण करत सराईत गुन्हेगारांनी त्याच्या गळ्यातील सोनसाखळी अन् पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्रही बळजबरीने हिसकावून नेल्याचे उघडकीस आले आहे.
कथडा परिसरातील भोई गल्ली भागात राहणारे फिर्यादी नदीम निसार खान हे त्यांच्या पत्नीसमवेत पंचवटी भागात जात असताना संशयित विकी बजाज, गुड्डू फसाळे, अजय कुंदे व अजय पूर्ण (सर्व रा. गणेशवाडी) नाव माहीत नाही यांच्यावर पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल सायंकाळी खान हे गणेशवाडीत असताना संशयितांनी त्यांच्या फोर्डफिगो कारजवळ (एमएच १५ सिटी ९०९१) येऊन काचेवर हात मारून काच फोडली तसेच नदीमला बेदम मारहाण करून त्याच्या गळ्यातील दीड तोळे वजनाची चैन तसेच त्याच्या पत्नीच्या गळ्यातून मंगळसूत्र असे ६० हजार रुपये किमतीचे दागिने बळजबरीने चोरून नेले. तसेच मारहाण करून दागिने पळविणाऱ्या टोळीतील काही संशयित सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर पोलीस ठाण्यात जबरी लूट चोरी, गुन्हे दाखल आहेत तर एकाला तडीपार करण्यात आले होते, तरीदेखील त्याचे परिसरात वास्तव्य असल्याने पोलिसांच्या गस्तीविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
गुन्हे शोध पथक भरकटले
पंचवटी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या गुन्हे शोध पथकातील पोलीस कर्मचारी अन्य पोलीस ठाण्यातून आल्याने त्यांना हद्दीची देखील व्यवस्थित माहिती नाही अनेक सराईत गुन्हेगार तडीपार आरोपी बिनधास्तपणे पंचवटीत वास्तव्य करत असले तरी याबाबत गुन्हे शोध पथकातील नव्या पोलीस कर्मचाऱ्यांना माहिती नसल्याने गुन्हेगारांचे फावत आहे.