धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी पुन्हा न्यायालयाकडेच दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 12:02 AM2018-10-12T00:02:02+5:302018-10-12T00:15:00+5:30
महानगरपालिकेच्या वतीने नाशिक शहरातील पाचशेहून अधिक धार्मिक स्थळांना बेकायदा ठरवून नोटिसा बजावलेल्या आहेत. नाशिक शहराची ओळख मंदिरांचे शहर असून, शहराची ओळख पुसण्याचे काम प्रशासन करत आहे. प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी सर्व धर्मियांच्या संघटना सज्ज असून, धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन मठ, मंदिर बचाव समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केले.
पंचवटी : महानगरपालिकेच्या वतीने नाशिक शहरातील पाचशेहून अधिक धार्मिक स्थळांना बेकायदा ठरवून नोटिसा बजावलेल्या आहेत. नाशिक शहराची ओळख मंदिरांचे शहर असून, शहराची ओळख पुसण्याचे काम प्रशासन करत आहे. प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढ्यासाठी सर्व धर्मियांच्या संघटना सज्ज असून, धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी एकत्र यावे, असे आवाहन मठ, मंदिर बचाव समितीच्या बैठकीत सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी केले.
मठ, मंदिर बचाव समितीची बैठक गुरु वारी (दि.११) सायंकाळी पटांगणावर साधू-महंत, विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी तसेच धार्मिक संघटनांच्या उपस्थितीत संपन्न झाली. प्रशासनाने धार्मिक स्थळांना नोटिसा बजावून पंधरवड्यात बांधकाम न हटविल्यास प्रशासन ते बांधकाम हटविणार असल्याचे स्पष्ट केल्याने धार्मिक स्थळे बचाव करण्यासाठी मठ, मंदिर बचाव समितीने पुढाकार घेतला आहे. प्रशासनाने अनेक धार्मिक स्थळे बेकायदा ठरवून नोटिसा बजावल्या आहेत. प्रशासनाने लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता केवळ टेबलवर बसून सर्वेक्षण केले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.
मनपात लोकप्रतिनिधींनी आवाज उठविल्यानंतर सर्वेक्षण झाले नसल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे बेकायदा धार्मिक स्थळे ठरविताना पोलीस प्रशासनालाही विचारलेले नाही. जर मंदिरे अनधिकृत असतील तर मंदिरासमोर आमदार खासदार निधीतून उभारलेली समाज मंदिरे अधिकृत कशी काय, असा सवाल यावेळी करण्यात आला.
धार्मिक स्थळे बचावण्यासाठी राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून सर्वपक्षीयांनी तसेच सर्व धर्मीयांच्या संघटनांनी एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात न्यायालयीन लढा देत चुकीच्या कारभाराला शह देण्यासाठी वेळप्रसंगी रस्त्यावर उतरण्याची तयारी ठेवावी, असा सूर बैठकीत निघाला. बैठकीला माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेस शहराध्यक्ष शरद अहेर, राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते गजानन शेलार, भाजपाचे दिनकर पाटील, विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, वत्सला खैरे, वैशाली भोसले, महंत भक्तिचरणदास, डॉ. हेमलता पाटील, राजेंद्र बागुल, रामसिंग बावरी, मुक्तार शेख, विनोद थोरात, कैलास देशमुख, दिगंबर धुमाळ, संतोष इसे उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच नोटिसा
गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौºयावर आले होते. मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच मंदिरांना रात्रीच्या वेळी नोटिसा लावण्याचे काम केले. मंदिरे धार्मिक स्थळे अनधिकृत नाही ही शक्तिस्थळे, भक्तिस्थळे असून न्यायालयाला पटवून दिले पाहिजे.