आचारसंहितेविरोधात न्यायालयात धाव
By Admin | Published: October 20, 2016 01:22 AM2016-10-20T01:22:02+5:302016-10-20T01:38:44+5:30
केदा अहेर : जिल्हा परिषदेला वगळा
नाशिक : नगरपालिकांच्या निवडणुकांमधून जिल्हा परिषदेला वगळण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंबळे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांकडे केल्यानंतर आता कृषी सभापती केदा अहेर यांनी या आचारसंहितेमुळे कोट्यवधींची विकासकामे रखडणार असल्याने त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.
बुधवारी (दि. १९) त्यांनी यासंदर्भात जिल्हा प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आचार संहितेच्या नियमांबाबत माहिती घेतली. तसेच या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांना फटका बसणार असल्याचे जिल्हा प्रशासनाला सांगितले.
नगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषदेचा तसा प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष थेट संबंध येत नाही. जिल्हा परिषदेच्या कोणत्याही योजनांचा थेट परिणाम नगरपालिका क्षेत्रातील मतदारांवर होत नाही. या आचारसंहितेमुळे जिल्हा परिषदेची कोट्यवधी रुपयांची विकासकामे रखडणार आहेत.
शिवाय दोनपेक्षा कमी जिल्ह्याला आचारसंहिता लागू नाही आणि चारपेक्षा जास्त नगरपालिकांच्या निवडणुका असलेल्या जिल्ह्यांसाठी आचारसंहिता लागू करणे म्हणजे समान न्यायाला धरून नसल्याने याबाबत आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याची माहिती कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा अहेर यांनी दिली. (प्रतिनिधी)