दोघांना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा
By Admin | Published: February 3, 2015 01:32 AM2015-02-03T01:32:06+5:302015-02-03T01:32:06+5:30
दोघांना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा
नाशिक : तीन वर्षांपूर्वी आडगाव ट्रक टर्मिनसमध्ये रंगपंचमीला झालेल्या वादातून गोकुळ मते यांचा खून झाला होता़ या खुनातील आरोपी अरुण देशमुख व योगेश बैरागी या दोघांना न्यायालयाने जन्मठेप व दंडाची शिक्षा सुनावली आहे़
१२ मार्च २०१२ रोजी रंगपंचमीच्या दिवशी आडगाव ट्रक टर्मिनसमध्ये दोन ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांकडे कामास असणाऱ्या नोकरांमध्ये वाद झाला़ त्याचे पर्यावसान दुसऱ्या दिवशी हाणामारीत झाले़ यामध्ये आरोपी अरुण सुरेश देशमुख व योगेश शांतीलाल बैरागी यांनी गोकुळ सुधाकर मते व अक्षयकुमार छाजेड ऊर्फ शकुनी मामा यांच्यावर चाकूने वार केले होते़ या हल्ल्यात मते व छाजेड गंभीर जखमी झाल्याने त्यांना आडगावच्या डॉ़ वसंत पवार रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचार सुरू असतानाच गोकुळ मते यांचा मृत्यू झाला़ या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आरोपी अरुण देशमुख व योगेश बैरागी यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता़ हा खटला अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अनिल खडसे यांच्या न्यायालयात सुरू होता़ या खटल्यात सरकारी वकील कल्पेश निंबाळकर यांनी अकरा साक्षीदार तपासले. यावर या दोघांनाही जन्मठेप व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली़ (प्रतिनिधी)