साडेचारशे नाशिककरांना न्यायालयाने ठोठावला दोन लाखांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2020 04:30 AM2020-12-14T04:30:50+5:302020-12-14T04:30:50+5:30
कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी ते अद्याप शून्यावर आलेले नाही. यामुळे शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना ...
कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण कमी झाले असले तरी ते अद्याप शून्यावर आलेले नाही. यामुळे शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना नागरिकांनी सुरक्षित सामाजिक अंतर आणि मास्कचा वापर करण्यास प्रथम प्राधान्य देणे गरजेचे आहे. याबाबत जिल्हा प्रशासनासह महापालिकला व पोलिसांकडून आवाहन केले जात आहे; मात्र याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र शहरात पहावयास मिळत आहे. नागरिक बेजबाबदारपणे मास्कविना शहरातील बाजारपेठांमध्ये वावरत आहेत. तसेच बहुतांश दुकानदारांकडूनदेखील मास्कची सक्ती ग्राहकांना केली जात नसल्याचे चित्र आहे. ‘चलता है’ ही प्रवृत्ती शहरात वाढीस लागत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
पोलिसांकडून या पार्श्वभूमीवर मास्कचा वापर न करणाऱ्यांविरुद्ध कलम-१८८नुसार उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जात आहेत. संबंधित बेजबाबदार लोकांना थेट न्यायालयात हजर केले जात आहे. ऑक्टोबरपासून आतापर्यंत ४३१ खटले न्यायालयाने निकाली काढले आहेत. यामध्ये १ लाख ८९ हजारांपेक्षा अधिक दंड अशा बेजबाबदार नागरिकांना ठोठावण्यात आला आहे. न्यायाधीश एस.के.दुगावकर, ए.एन.शहा, एस.एस.सस्ते, एस.के.ढेकळे, जे.के.आर टंडन, एच.यू.जोशी आणि बी.के.गावंडे यांच्या न्यायालयात कलम-१८८नुसार दाखल खटल्यांचा निपटारा करण्यात आला.
---इन्फो--
राज्य पोलीस कायद्यान्वये दीड हजार लोकांना शिक्षा
शहरात सार्वजनिक ठिकाणी असभ्य वर्तन करत टवाळखोरी करणाऱ्यांविरुद्ध निर्भया पथकाकडून शहरातील १३ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नियमितपणे कारवाई केली जात आहे. ऑक्टोबरपासून आतापर्यंत सुमारे दीड हजारांपेक्षा अधिक टवाळखोरांवर कलम-११० व ११७ नुसार कारवाई करण्यात येऊन त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दंडाची शिक्षा सुनावली. यामध्ये एकूण १ लाख २३ हजारांपेक्षा अधिक दंड करण्यात आला आहे. या खटल्यांची सुनावणी न्यायाधीश टी.एन.कादरी, पी.ए.राजपूत, ए.एन सरस, पी.एन.आवळे, ए.एम.शिंदे यांच्या न्यायालयात झाली.