कोर्टाची सिव्हिलला नोटीस अन् झनकर ठणठणीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:20 AM2021-08-19T04:20:29+5:302021-08-19T04:20:29+5:30
वैशाली झनकर यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी (दि.१७) त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन ...
वैशाली झनकर यांची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी (दि.१७) त्यांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांचा अंतरिम जामीन नामंजूर करीत न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. मात्र, वैद्यकीय तपासणीदरम्यान त्यांची प्रकृती बरी नसल्याचे कारण जिल्हा रुग्णालयाने देत त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले. तत्पूर्वीही दोन दिवस पोलीस कोठडीच्या कालावधीत झनकर जिल्हा रुग्णालयातच होत्या. दरम्यान, बुधवारी या प्रकरणात सरकारी पक्षाकडून न्यायालयापुढे ही बाब मांडण्यात आली. न्यायालयीन कोठडीत असताना संशयित झनकर यांना जिल्हा शासकीय रुग्णालयाकडून का ॲडमिट करून घेतले जात असल्याचे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयाला सांगितले. न्यायालयानेदेखील याबाबत नाराजी व्यक्त करीत जिल्हा शल्य चिकित्सकांना नोटीस बजावून रुग्णालयाकडे अहवाल मागितला आहे.
--इन्फो--
नोटीसचा आदेश अन् झनकरांना रुग्णालयातून सुटी
दरम्यान, नोटीस बजावण्याचा आदेश न्यायालयाने दुपारी साडेतीन वाजता केला आणि जिल्हा रुग्णालयाला नोटीस संध्याकाळी पोहोचली. मात्र, दुपारी साडेचार वाजेच्या सुमारासच जिल्हा रुग्णालयाने झनकर या ठणठणीत असल्याचा निर्वाळा देत ‘डिस्चार्ज’ केले हे विशेष! बुधवारी न्यायालयात झनकर यांचे वकील हजर न राहिल्याने सुनावणी होऊ शकली नाही. न्यायालयाने येत्या शुक्रवारपर्यंत (दि.२०) सुनावणी तहकूब ठेवली आहे.
---