१५ कोटी रुपये भरण्याचे न्यायालयाचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:32 AM2018-10-31T00:32:36+5:302018-10-31T00:33:14+5:30
आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची २१ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला़
नाशिक : आर्थिक व सोने गुंतवणुकीवर जादा व्याजाचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची २१ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या मिरजकर सराफ व त्रिशा जेम्सच्या संचालकांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) गुन्हा दाखल केला़ या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांनी न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला असून, न्यायालयाने संचालक महेश मिरजकर, प्राजक्ता कुलकर्णी व भारत सोनवणे यांना १५ कोटी रुपये न्यायालयात भरण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश पी़ आऱ देशमुख यांनी मंगळवारी (दि़३०) सुनावणीदरम्यान दिले़ मिरजकर सराफ गुंतवणूकदार फसवणूक प्रकरणातील प्रमुख संशयित व संचालक महेश मधुकर मिरजकर, प्राजक्ता रवींद्र कुलकर्णी, भारत मार्तंडराव सोनवणे आणि इतर यांनी गुन्ह्यात जामीन मिळावा यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केलेला असून यावर गत काही दिवसांपासून न्यायालयात सुनावणी सुरू होती़ न्यायाधीश देशमुख यांच्या न्यायालयात मंगळवारी जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी या फसवणुकीची व्याप्ती मोठी असून, सामान्यांकडून योजनेच्या नावाखाली संशयितांनी पैसे जमा करून मोठ्या प्रमाणात फसवणूक केल्याचा युक्तिवाद केला़ तसेच आरोपींनी केलेली फसवणुकीची रक्कम २१ कोटी रुपयांच्या वर गेली असून, गुंतवणूकदांचे २४,८८३़१६ ग्रॅम सोनेही लाटले आहे़ तसेच या गुन्ह्यातील प्रमुख हर्षल नाईक, माजी नगरसेवक यांच्यासह काही जण फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे़ अॅड़ केंगे यांच्या फिर्यादीनुसार संचालक महेश मिरजकर, हर्षल नाईक, माजी नगरसेवक अनिल चौघुले, श्रेयस आढाव, परीक्षित औरंगाबादकर, सुरेश भास्कर, भारत सोनवणे, वृषाली नगरकर, विजयदीप पवार, प्राजक्ता कुलकर्णी व कीर्ती नाईक यांच्याविरोधात महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्यान्वये (एमपीआयडी) हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे़
न्यायाधीश देशमुख यांनी उभयपक्षांचा युक्तिवाद विचारात घेऊन संचालक महेश मिरजकर यास पाच समान हप्त्यात ५ कोटी रुपये व ५० लाख रुपयांचा बॉण्ड, प्राजक्ता कुलकर्णी, कीर्ती नाईक, भारत सोनवणे, वृषभ नगरकर, विजयदीप पवार यांना प्रत्येकी दोन कोटी रुपये दोन समान हप्त्यात भरण्याचे आदेश दिले असून काही अटी व शर्तींवर जामीन देण्याचे निर्देशित केले आहे़