‘त्या’ सात धार्मिक स्थळांना अनधिकृत ठरवत न्यायालयाने याचिका फेटाळली; नाशिक महापालिकेकडून कारवाई सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 04:49 PM2017-11-16T16:49:43+5:302017-11-16T17:04:16+5:30
मोहीम शांंततेत सुरू असून, मुस्लीम समाजाच्या वतीने शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह मौलाना मुफ्ती सय्यद आसिफ इकबाल, मौलाना इब्राहीम कोकणी, नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा, असलम खान आदिंनी संबंधित धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांसह परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन कायद्याची बाजू आणि उच्च न्यायालयाचा निकालाबाबत माहिती दिली.
नाशिक : शहरातील विविध उपनगरीय परिरसरातील रस्त्यांलगत असलेल्या ‘त्या’ सात धार्मिक स्थळांच्या कारवाईबाबतची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानंतर नाशिक महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाच्या वतीने सकाळी साडेदहा वाजेपासून कारवाईला सुरूवात करण्यात आली. मुंबईनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील मुंबईनाका येथील एका धार्मिक स्थळाचे अतिक्रमण हटवित पालिकेने कारवाई सुरू केली. मोहीम शांंततेत सुरू असून, मुस्लीम समाजाच्या वतीने शहर-ए-खतीब हिसामुद्दीन अशरफी यांच्यासह मौलाना मुफ्ती सय्यद आसिफ इकबाल, मौलाना इब्राहीम कोकणी, नुरी अकादमीचे हाजी वसीम पिरजादा, एजाज रजा, असलम खान आदिंनी संबंधित धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांसह परिसरातील नागरिकांची बैठक घेऊन कायद्याची बाजू आणि उच्च न्यायालयाचा निकालाबाबत माहिती दिली.
त्याचप्रमाणे धर्मगुरूंनी शरियतनुसार दर्ग्यामधील मजाराचे पुन्हा सुरक्षित ठिकाणी क ब्रस्तानात विधिवत दफनविधी करण्याबाबतची माहिती दिली. त्यानंतर सकाळपासूनच संबंधित विश्वस्तांनी व परिसरातील स्थानिक युवकांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घेत महापालिकेचे जेसीबी यंत्रे व लवाजमा सदर धार्मिक स्थळापर्यंत पोहचण्याअगोदरच बांधकाम काढून घेण्यास सुरूवात केल्याचे चित्र दिसून आले. एकूणच शहरातील मुस्लीम समुदायाचे नेतृत्व करणा-या धर्मगुरूंनी व विविध धार्मिक संघटनांच्या प्रतिनिधींनी सामंजस्याची भूमिका घेत उच्च न्यायालयाच्या आदेश व त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन कुठल्याहीप्रकारे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घेत परिसरातील जमावाचे प्रबोधन करण्यावर भर दिला. त्यामुळे धार्मिक स्थळांचे अतिक्रमण हटाव मोहिमेला अद्याप कुठलाही अडथळा आलेला नसून मोहीम शांततेत सुरू आहे. पालिकेने दोन धार्मिक स्थळांचे पक्के बांधकाम हटविले आहे. एकूण सात धार्मिक स्थळांचे अतिक्रमणे हटविण्यात येणार असल्याची माहिती उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली.
दरम्यान, या मोहीमेला पोलीस आयुक्तालयाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त पुरविण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, विजय मगर, सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली रॉयट कंट्रोल पोलीस पथक, राज्य राखीव दलाची तुकडीचे जवान आणि स्थानिक पोलीस ठाण्याचे पोलीस बळाचा बंदोबस्त पुरविला आहे. भारतनगर, पखालरोड, नासर्डी पूल, नानावली आदि परिसरातील धार्मिक स्थळांना मिळालेली स्थगिती न्यायालयाने उठविल्यामुळे या भागातील एकूण सात धार्मिक स्थळे हटविली जाणार असून कारवाईला सुरूवात करण्यात आली आहे. या कारवाईबाबत मुस्लीम समुदायानेदेखील सहकार्य आणि सामंजस्याची भूमिका घेतल्याने शांततेत मोहीम सुरू आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन शहराचे खतीब हिसामुद्दीन अशरफी यांनी केले आहे.