अनाथ बालगृहातील गैरप्रकारावर पांघरूण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 01:08 AM2017-07-23T01:08:04+5:302017-07-23T01:08:49+5:30
पेठ : येथील कापूर झरीपाडा अनाथ मुलींच्या बालगृहातील अनेक गैरप्रकार घडत असतांना महिला व बालविकास विभाग याकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पेठ : येथील कापूर झरीपाडा अनाथ मुलींच्या बालगृहातील अनेक गैरप्रकार घडत असतांना महिला व बालविकास विभाग याकडे डोळेझाक करत असल्याची चर्चा सुरू असून शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या येथील मुलींची एक वर्षापासून आरोग्य तपासणीच झाली नसल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. कोणत्याही निवासी शाळा अथवा वस्तीगृहात राहणाऱ्या मुलांची नियमीत आरोग्य तपासणी करण्याबाबत शासनाचा दंडक असून तालुक्यातील शासकिय आश्रमशाळा व अनुदानित वस्तीगृहातील मुलांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी ग्रामीण रु ग्णालय पेठ अंतर्गत स्वतंत्र फिरते पथक तयार करण्यात आले आहे. कापुरझरीपाडा येथील अनाथ बालगृहात उघडकीस आलेल्या कथित लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर ग्रामीण रुग्णालयात आरोग्य तपासणीबाबत आढावा घेतला असता. ग्रामीण रु ग्णालयाच्या तपासणी पथकाच्या अंतर्गत सदरचे बालगृह येत नसून त्यांनी तपासणीची लेखी मागणी केली तरच वैद्यकिय तपासणी करण्यात येते. मात्र यापूर्वी १ जूलै २०१६ रोजी या मुलींची केवळ आजारासंदर्भात तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित व्यवस्थापनाकडून कोणत्याही प्रकारची तपासणी करण्याबाबत कळवले नसल्याचे वैद्यकिय आधिकाऱ्यांनी सांगितले. यावरून या बालगृहात वास्तव्यास असलेल्या मुलींची तब्बल एक वर्षापासून वैद्यकीय तपासणी झाली नसतांनाही ही बाब प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या भेटीत लक्षात कशी आली नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माहिती देण्यास अधिकाऱ्यांची टाळाटाळ
शासनाच्या नियमानुसार या बालगृहाला १३० मुलींची मान्यता असतांना प्रत्यक्षात ५८ मुली आढळून आल्या. किती मुली दाखल झाल्या व त्यापैकी किती सोडून गेल्या याबाबतची माहिती देण्यास चौकशीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी टाळाटाळ केल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर संशयाची सुई दिसते. सदरचा संपूर्ण प्रकार उघडकीस आणलेल्या पिडीत मुलीबरोबर अत्याचाराच्या बळी पडलेल्या अजून काही मुली या बालगृहातून अचानक गायब झाल्याचे गुढही या तपासात उघडकीस येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. सद्या या बालगृहातील ५८ मुलींना नाशिक शहरात दाखल करण्यात आले असून त्यांच्या शाळा व महाविद्यालयातील उपस्थितीबरोबर त्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम होणार असून प्रशासनाने तात्काळ त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था लावण्याची आवश्यकता आहे.