कोविड सेंटर लवकरच, लॅबची रविवारी चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:14 AM2021-03-18T04:14:51+5:302021-03-18T04:14:51+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरात वाढत असून ही संख्या आठशे ते नऊशे इतकी आहे. ...
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी सर्वाधिक रुग्ण नाशिक शहरात वाढत असून ही संख्या आठशे ते नऊशे इतकी आहे. नागरिक सामान्यत: गृहविलगीकरणाला प्राधान्य देत असले तरी कोरोना बळींची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयातदेखील गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिकेने अगोदरच खासगी रुग्णालयांची सद्यस्थिती कळावी यासाठी ॲप सुरू केले आहे. त्याचबरोबर आता कोविड केअर सेंटर्स पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नाशिक-पुणे रोडवरील समाजकल्याण विभागाचे सेंटर लवकरच सुरू करण्यात येणार असून त्यानंतर पंचवटीत मेरी तसेच त्र्यंबकरोडवरील ठक्कर डोम येथील सेंटर्स सुरू करण्यात येणार आहे.
औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत कोरोना चाचणीचे नमुने पाठवल्यानंतर त्याचे अहवाल मिळण्यास विलंब होत असल्याने तेथे नमुने पाठवणे बंद करण्यात आले आहे. हाफकिन्स इन्स्टिट्यूटमध्ये दोनशे नमुनेच पाठवले जात आहेत. बाकी नमुने जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असले तरी तेथे मुळातच क्षमता कमी असल्याने तेथेही अहवाल प्रलंबित आहे. त्यामुळे महापालिकेच्या वतीने आता बिटको रुग्णालयातील लॅब सुरू करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. रविवारी (दि.२१) या लॅबची चाचणी करण्यात येणार आहे.
इन्फो....
बाधितांच्या हातावर शिक्के
गृहविलगीकरणात राहणारे कोरोनाबाधित अनेकदा रस्त्यावर फिरत असल्याने त्यांच्या माध्यमातून संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे आता पुन्हा गृहविलगीकरणात राहणाऱ्या बाधितांच्या हातावर शिक्के मारण्यात येणार आहे.