वासराला वाचविताना गाईने गमावला जीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 02:53 PM2020-02-28T14:53:09+5:302020-02-28T14:57:32+5:30

बिबट्याचा हल्ला : बोपेगाव येथे घडली घटना

 The cow lost its life while saving the calf | वासराला वाचविताना गाईने गमावला जीव

वासराला वाचविताना गाईने गमावला जीव

Next
ठळक मुद्देबिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

दिंडोरी : ‘आईचे काळीज, तुटते लेकरा, गाय रे वासरा, हंबरते...’या अभंगात माय-लेकराचे नाते उधृत केलेले आहे. मनुष्य असो प्राणी, आई या शब्दाला हळवेपणाची, संवेदनशीलतेचीही किनार आहे. मुक्या प्राण्यालाही भावना असतात आणि आपल्या बाळाप्रती त्यांच्याही संवेदना असतात. त्याचा प्रत्यय दिंडोरी तालुक्यातील बोपेगाव येथे आला आहे. वसंत कावळे यांच्या गोठ्यात दोन दिवसांच्या वासरावर बिबट्याने हल्ला चढविला तेव्हा आक्रमक होत गाईने बिबट्याचा हल्ला परतावून लावला परंतु, या संघर्षात वासराचे प्राण वाचविताना गाईला आपला जीव गमवावा लागला.
बोपेगाव येथील शेतकरी वसंत रु ंजाजी कावळे यांचे गोठ्यात दोन दिवसांपूर्वीच जन्माला आलेल्या वासरासोबत गाय बांधण्यात आलेली होती. गुरु वारी पहाटे (दि.२७) बिबट्याने गोठ्यात प्रवेश करत वासरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आक्रमक झालेल्या गाईने हा हल्ला परतवून लावला. या संघर्षात बिबट्याने गाईवर मागून हल्ला चढवत तिला जबर जखमी केले. त्यात गाईला आपले प्राण गमवावे लागले मात्र तिने आपल्या वासराचे संरक्षण केले . सकाळी जेव्हा ही घटना लक्षात आली त्यावेळी मृत्युमुखी पडलेल्या आपल्या आईची मान चाटत वासरू हंबरताना दिसून आले. हे करुण दृश्य पाहून तेथे उपस्थित असलेल्यांना गहिवरून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला आहे .
दरम्यान, बोपेगाव परिसरात बिबटयाने धुमाकूळ घातला असून वन विभागाने बिबट्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे .

Web Title:  The cow lost its life while saving the calf

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक