अपघातात मृत्युमुखींच्या स्मरणार्थ दिवे प्रज्वलित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2019 11:20 PM2019-02-08T23:20:38+5:302019-02-09T00:34:44+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाढत्या अपघातांवर नियंत्रण बसावे तसेच वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे.
पंचवटी : प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने वाढत्या अपघातांवर नियंत्रण बसावे तसेच वाहनधारकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे यासाठी संपूर्ण जिल्ह्यात रस्ता सुरक्षा अभियान राबविले जात आहे.
या अभियानाच्या माध्यमातून शुक्रवारी (दि.८ ) सायंकाळी गंगाघाटावर प्रादेशिक परिवहन कार्यालय, महिंद्र अॅण्ड महिंद्र, नन्ही कली फाउंडेशन, वाव फाउंडेशन व आॅल इंडिया ट्रान्सपोर्ट फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षिततेसाठी मानवी साखळी करण्यात येऊन गेल्यावर्षी अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १०४१ नागरिकांना भारताच्या आकाराचा नकाशाचा करून दिवे लावत श्रद्धांजली वाहण्यात आली.
गेल्यावर्षी जिल्हा व शहरात १०४१ नागरिकांना अपघातात जीव गमवावा लागला होता. अपघातात मृत्युमुखी पडलेले नागरिक देशाचे नागरिक होते व त्यांचे देशासाठी काहीतरी योगदान असल्याने आता ते देशाला मिळू शकत नाही त्यांनी देशासाठी केलेल्या योगदानाची परतफेड म्हणून शुक्र वारी सायंकाळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी गंगाघाटावर शेकडो दिवे पेटविण्यात आले होते. यावेळी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद साळवी, मोटार वाहन निरीक्षक सचिन बोधले, संदीप निमसे, धनंजय गोसावी, निंबा अहेर, कमलाकर धोंगडे, आदींसह फाउंडेशनचे सभासद पदाधिकारी उपस्थित होते.
जनजागृती : श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नये
पुढल्यावर्षी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ येऊ नये यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त गंगाघाटावर चित्र प्रदर्शन लावण्यात आले होते.