काल्पनिक शहर उभारीत विद्यार्थ्यांनी साकारला जिवंतपट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:27 AM2019-09-15T00:27:19+5:302019-09-15T00:27:40+5:30
एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीप्रमाणेच वास्तुशास्त्रातही उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या संकल्पनेतून आयडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थेट महाविद्यालयातच काल्पनिक शहर उभे करीत जिवंतपट साकारताना शहरात घडणाऱ्या विविध गोष्टींना नागरिकच कसे जबाबदार असतात याचे चित्रणही अगदी हुबेहूब रंगवले.
नाशिक : एखाद्या चित्रपटाच्या निर्मितीप्रमाणेच वास्तुशास्त्रातही उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या संकल्पनेतून आयडिया महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी थेट महाविद्यालयातच काल्पनिक शहर उभे करीत जिवंतपट साकारताना शहरात घडणाऱ्या विविध गोष्टींना नागरिकच कसे जबाबदार असतात याचे चित्रणही अगदी हुबेहूब रंगवले.
इन्स्टिट्यूट आॅफ डिझाइन इन्व्हार्मेंट अॅण्ड आर्किटेक्चर अर्थात आयडिया महाविद्यालतर्फे दरवर्षी राबविण्यात येणाºया ‘व्हर्टिकल स्टुडिओ’ उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शहरातील भुयारी गटारी, इमारती, कचरा, पब आदी सगळ्याच गोष्टींचा विचार करीत शहर उभे करतानाच विद्यार्थ्यांनी अभिनयातून सोशल मीडियावर होणारे आत्महत्याचे चित्रीकरण, स्वच्छता कर्मचाऱ्यांचे जगणे, पबमधला संगीताच्या नावाखाली होणारा गोंधळ, धर्मावरून होणारे हिंसाचार, मॉलच्या वस्तूंचे वाढते आकर्षण असे विविध विषय हाताळले. यावर्षी ‘आयडिया आॅफ प्लेस’ हा विषय घेऊन अतुल पेठे (पुणे ), अविजीत किशोर (मुंबई ), अभिजित सौमित्र (पुणे), रोहन शिवकुमार (मुंबई), सोनम पठाण (दिल्ली) यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेच्या शेवटच्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी चित्रपटाप्रमाणे जिवंतपट सादर करीत शहराप्रमाणे बाजारपेठेचे चित्र रंगवत शहराची अर्थव्यवस्था दाखविण्याचा प्रयत्न करताना बाजारात एका जागेवर सकाळी फुलवाला त्यानंतर भाजी आणि कपडे विक्रीचा व्यापार कसा चालतो याचे चित्रण ‘बाजार’ या चित्रपटात करण्यात आले. तर नाशिकमधील महापुरानंतरचे बोलके चित्रण ‘अवगत’मधून करण्यात आले. ‘रिकनायझन्स’ ग्रुपने नाशिककरांच्या सार्वजनिक वाचनालय, गोदाघाट या परिसराविषयी नागरिकांच्या भावनांचे चित्रण रंगवले.