पर्यावरण रक्षणासाठी क्रेडाईचा पुढाकार
By admin | Published: May 17, 2015 11:49 PM2015-05-17T23:49:12+5:302015-05-17T23:52:43+5:30
भूमिपूजन : ४३ एकर जागेला घालणार कुंपण
नाशिक : सामाजिक बांधिलकी म्हणून पर्यावरण रक्षणासाठी क्रेडाईने पुढाकार घेत फाशीच्या डोंगर परिसरातील वृक्षारोपण मोहिमेत सहभाग नोंदविला आहे. नाशिक क्रेडाई, वन विभाग व आपला पर्यावरण ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यावरण रक्षणासाठी सातपूर येथील वन कक्ष क्र. २२२ (फाशीचा डोंगर) या ४३ एकर जागेला कुंपण बांधून देण्यासाठीचे भूमिपूजन केले.
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ५ जून रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लोकसहभागातून या परिसरात दहा हजार वृक्षारोपण करण्याची मोहीम राबविण्यात येणार आहेत. त्याकरिता वनक्षेत्राच्या चहुबाजूने चेनलिंग कुंपण बांधण्यात येणार असून, त्याकरिता अंदाजे ८ ते १० लाख रुपये खर्च येण्याची शक्यता आहे. दरम्यान, वृक्षारोपणासाठी खड्डे बनविण्याचे काम प्रगती पथावर असून, आतापर्यंत साधारणत: सहा हजारांपेक्षा अधिक खड्डे खोदण्यात आले आहेत. याठिकाणी वर्षभर पक्षांचा अधिवास राहावा याकरिता फळवृक्षांचे रोपण व संवर्धन केले जाणार आहे. तसेच छोटेसे बटर फ्लाय गार्डनही विकसित करण्यात येणार असल्याचे नाशिक क्रेडाईचे अध्यक्ष जयेश ठक्कर यांनी सांगितले. याकरिता विपश्यना केंद्र यांनी तीन इंच पाइपलाइन करण्याची जबाबदारी स्वीकारल्याने वृक्षांची तथा उद्यानाची देखभाल करणे शक्य होईल.
दरम्यान, याप्रसंगी नगरसेवक दिनकर पाटील, पर्यावरणप्रेमी शेखर गायकवाड, वनपाल वाघ, वनरक्षक देवरे, क्रेडाईचे उपाध्यक्ष अभय तातेड, अमोल पाटील, रमेश अय्यर, अमित रोहमारे, कृणाल पाटील, शंतनु देशपांडे, हितेश पोतदार, अमोल सावंत, सुनील गवादे, मयूर कपाटे आदि उपस्थित होते.