कुटुंब आणि जातीत अडकलेल्या सत्तेला लावणार सुरुंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 12:26 AM2018-10-13T00:26:17+5:302018-10-13T00:44:40+5:30
नाशिक : कुटुंब आणि जातींमध्ये अडकलेल्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी बहुजन वंचित आघाडी काम करणार असून, खुंटलेल्या लोकशाही आणि विकासाच्या ...
नाशिक : कुटुंब आणि जातींमध्ये अडकलेल्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी बहुजन वंचित आघाडी काम करणार असून, खुंटलेल्या लोकशाही आणि विकासाच्या विचाराला चालना देण्यासाठीच राजकीय निर्णय क्षमता निर्माण करणे अपेक्षित आहे, असे प्रतिपादन बहुजन विकास वंचित आघाडीचे प्रणेते आणि भारिपचे राष्टÑीय नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले.
शहरातील औरंगाबादकर सभागृहात आयोजित बहुजन वंचित विकास आघाडीच्या उत्तर महाराष्टÑ पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भारिपचे जिल्हाध्यक्ष पवन पवार, शिवाजी ढेपले, अण्णासाहेब सूर्यवंशी, बाजीराव बोडके, जावेद मुन्शी, अॅड. अरुण जाधव, प्रभात सोनवणे, प्रा. किसन चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी आंबेडकर म्हणाले, आगामी निवडणुका या वंचित बहुजन विकास आघाडीच्या बॅनरखालीच लढविल्या जातील. सत्ताकारणासाठीचे सकारात्मक चित्र आघाडीपुढे असले तरी सत्तेपेक्षाही आघाडीच्या माध्यमातून निर्णयक्षमता निर्माण करणारी ताकद गावपातळीपासून निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचे आंबेडकर म्हणाले. आहे.
प्रारंभी विभागातून आलेल्या विविध समाजाच्या आणि संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी चारही जिल्ह्यांतून पदाधिकारी उपस्थित होते.
३० टक्के महिलांना देणार संधी
वंचित समाजातील महिला या घरात सुरक्षित आहेत, परंतु समाजात नाहीत असे आपण नेहमी सांगतो. या समाजातील महिलांना राजकीय प्रतिनिधित्व देण्याची आपली व्यापक भूमिका आहे. त्यांचा हक्क आणि प्रतिष्ठेसाठी त्यांना प्रतिनिधित्व देताना जागांच्या गणितानुसार ३० टक्के प्रतिनिधित्व देण्याबाबत विचार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी जाहीर केले.