लष्करी जवानाच्या पार्थिवावर वीरगाव येथे अंत्यसंस्कार
By admin | Published: June 14, 2014 12:14 AM2014-06-14T00:14:45+5:302014-06-14T01:54:36+5:30
वीरगाव : जम्मू येथील सांबा सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या वीरगाव येथील संजय नेरकर या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पार्थिव शरीर वीरगाव येथे आणण्यात आले.
वीरगाव : जम्मू येथील सांबा सेक्टरमध्ये कार्यरत असलेल्या वीरगाव येथील संजय नेरकर या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर पार्थिव शरीर वीरगाव येथे आणण्यात आले. यावेळी शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. बागलाणचे तहसीलदार अश्विनीकुमार पोतदार यांनी पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करुन श्रद्धांजली अर्पण केली. तर सीमा सुरक्षा व पोलीस दलाच्या सलामी पथकाने हवेत बंदुकीच्या फैरी झाडुन संजय नेरकर यांना अखेरची मानवंदना दिली. आठ वर्षीय रोशनने आपल्या पित्यास मुखाग्नी दिला.
विरगाव येथील विठ्ठल नेरकर यांचे सुपुत्र संजय हे वर्षापुर्वी सीमा सुरक्षा दलाच्या ९ बटालियन मध्ये भरती झाले होते. सद्यस्थितीत जम्मु येथील सांबा सेक्टरमध्ये आपले कर्तव्य बजावत होते. तेथेच त्यांचा अपघाती मृत्यु झाला. यानंतर सुमारे ३६ तासांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पार्थिव विरगाव येथे आणण्यात आले.
संजयचे पार्थिव विरगाव येथे आणताच नेरकर परिवारातील सदस्यांनी अक्षरश: हंबरडा फोडला. तर वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षीच संजय सर्वाना सोडुन गेल्याने नातेवाईक, मित्रमंडळी व ग्रामस्थांना ही यावेळी गहिवरुन आले होते. काल सकाळी ८ वाजेच्या सुमारास पार्थिव विरगाव येथे सिमा सुरक्षा दलाच्या खास वाहनाने आणण्यात आल्यानंतर मुखदर्शनानंतर ते सजविलेल्या ट्रॅक्टरमधून गावातुन या वीर जवानाची मिरवणुक काढण्यात आली. संजय नेरकर जिंदाबाद अशा घोषणांनी परिसर दुमदुमुन गेला होता. अंत्ययात्रेसाठी जनसमुदाय उपस्थित होता.
ग्रामीण पोलीस दलाच्या सलामी पथकाने हवेत ३ फैरी तर सिमा सुरक्षा दलाच्या जवानांनी ५ फैरी झाडुन संजयला मानवंदना दिली. यावेळी आमदार उमाजी बोरसे, संजय चव्हाण यांसह राजकीय, सामाजिक, महसुल व शासकीय सेवेतील अनेक मान्यवर उपस्थित होते.