नाशिकमध्ये क्रिकेट फिव्हर! तरुणाईकडून रॅली, मोठ्या स्क्रीनवर अंतिम सामन्याचे प्रक्षेपण
By संजय पाठक | Updated: November 19, 2023 14:29 IST2023-11-19T14:28:58+5:302023-11-19T14:29:38+5:30
रविवार सुट्टीचा दिवस आणि त्यातच विश्वचषक अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत होणार असल्याने नाशिक मध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

नाशिकमध्ये क्रिकेट फिव्हर! तरुणाईकडून रॅली, मोठ्या स्क्रीनवर अंतिम सामन्याचे प्रक्षेपण
नाशिक- विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी तमाम भारतवासीय सज्ज झाले असून नाशिक मध्ये ही क्रिकेट फुव्हर चढला आहे. नाशिक शहराच्या विविध भागात आज तरुणांनी तिरंगा ध्वज घेऊन बाईक तसेच मोटार सायकल रॅली काढल्या आणि भारताचा जयघोष करतानाच भारतीय संघाला विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
रविवार सुट्टीचा दिवस आणि त्यातच विश्वचषक अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी लढत होणार असल्याने नाशिक मध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कॉलेज रोडवरील बिग बाजार येथे एका नाशिक युथ फौंडेशनच्यावतीने मल्टिप्लेक्सच्या मोठ्या पडद्यावर विनामूल्य अंतिम सामन्याचे प्रक्षेपण आयोजित केले आहे दुपारी दीड वाजेपासून हे प्रक्षेपण सुरू होणार आहे. याशिवाय पंचवटी भागातील पाथरवट लेन येथेही एका गजानन मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या पडद्यावर मॅच दाखवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिक शहरातील विविध सोसायट्यांमध्ये गेट-टुगेदर आणि मॅच प्रक्षेपण बघण्याची व्यवस्था करण्यात आली आहे याशिवाय शहरातील गार्डन रेस्टॉरंटच्या ठिकाणीही मोठ्या पडद्यांवर क्रिकेटचे सामने दाखवण्यात येणार आहेत. काही हॉटेल्सने सामन्यामुळे बिलामध्ये सवलत देण्याची ही घोषणा केली आहे. नाशिक मधील एक क्रिकेट प्रेमी अवलिया सचिन गीते यांनी पाच तोळे सोन्याचं विश्व चषकाच्या आकाराचं लॉकेट देखील तयार करून घेतलं आहे. अंतिम सामना सुरू होईल तसा क्रिकेटचा फीवर वाढणार आहे. भारताच्या कामगिरीवर पुढील मूड राहणार आहे असे दिसते.