नांदगावच्या रस्त्यांवर रात्रीस चाले क्रिकेटचा खेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 04:13 AM2021-05-15T04:13:37+5:302021-05-15T04:13:37+5:30
नांदगाव : नांदगावच्या रस्त्यांवर सध्या दुकानदार आणि पोलीस यात लपाछपीचा खेळ सुरू असल्याने दिवसातले काही तास लॉकडाऊन असतो आणि ...
नांदगाव : नांदगावच्या रस्त्यांवर सध्या दुकानदार आणि पोलीस यात लपाछपीचा खेळ सुरू असल्याने दिवसातले काही तास लॉकडाऊन असतो आणि अनेक तास शटरच्या मागे दुकाने सुरू असतात. रात्री रस्त्यावर क्रिकेटचा खेळ दणक्यात सुरू असल्याने त्रास होत असल्याची वृद्धांची तक्रार आहे. पोलिसांची पाठ वळली की कडक निर्बंधांची ऐसीतैसी होते. त्यामुळे कडक लॉकडाऊन फक्त कागदावर उरला आहे.
रात्री नऊ वाजेनंतर क्रिकेटपटू रस्त्यावर उतरतात. मधोमध एक फाळके लावून स्टंप बनवले की, प्रत्येक चेंडूवर जोरदार आरडाओरडा सुरू होतो. चेंडू अनेकदा घराच्या दरवाजावर, खिडक्या यांवर येऊन आदळतात. दुकानाचे शटरवर आपटून मोठे आवाज होतात. खेळणाऱ्यात वादही होतात. कधी कधी तर एवढे मोठे आवाज ऐकू येतात की रस्त्यावर काही झाले की काय असे वाटून नागरिक घराबाहेर येतात. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून दररोज रात्री हा प्रकार सुरू असल्याने वृध्द ही त्रस्त झाले आहेत. पोलिसांनी हस्तक्षेप करून नागरिकांचा छळवाद थांबवावा, अशी मागणी करण्यात येत आहे. रात्री दर तासाला शहरात दोन पोलिसांनी गस्त फेरी मारली तरी या प्रकाराला आळा बसेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. कडक लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी अशी परिस्थिती नव्हती, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
रात्री १२ वाजेपर्यंत ठिकठिकाणी सुरू असलेल्या क्रिकेटमुळे नागरिकांच्या रात्रीच्या झोपा उडाल्या आहेत. परंतु रस्त्यावरच्या त्या टग्यांपुढे बोलण्याची कोणाची हिम्मत होत नाही. आजारी नागरिक व महिला यांना होणारा त्रास थांबवावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
--------------
रस्त्यावर क्रिकेट खेळून नागरिकांच्या त्रासाला कारणीभूत ठरणाऱ्या क्रिकेटपटूंचा त्वरित बंदोबस्त करू. नागरिकांनी कोरोनाविरुध्द लढाईत आत्मसंयम बाळगावा. ज्येष्ठ व इतर नागरिकांना मन:स्ताप होईल, असे वतर्न करू नये. -अनिल कातकडे, पोलीस निरीक्षक, नांदगाव