शहर बससेवेबाबत ‘क्रिसील’ देणार अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 12:18 PM2017-11-02T12:18:14+5:302017-11-02T12:20:44+5:30
सल्लागार नियुक्त : मनपाकडून तीन महिन्यांची मुदत
नाशिक - महापालिकेने शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतची व्यवहार्यता तपासून पाहण्यासाठी सल्लागार म्हणून के्रडीट रेटींग अॅण्ड इन्फर्मेशन सर्व्हीसेस आॅल इंडिया लिमिटेड अर्थात क्रिसील या संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर संस्थेला जानेवारी २०१८ पर्यंत अहवाल सादर करण्याची मुदत देण्यात आली असून त्यानंतर शहर बससेवेचा फैसला होण्याची शक्यता आहे.
शहर बससेवा तोट्यात चालल्याने एसटी महामंडळाने गेल्या काही महिन्यांत बऱ्याच मार्गावरील फेऱ्या कमी केल्या आहेत. शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेण्याबाबतही महामंडळाने वारंवार आग्रह चालविला असून त्याबाबतची स्मरणपत्रेही दिली पालिकेला पाठविली जात आहेत. दरम्यान, शहर बससेवा महापालिकेने ताब्यात घेऊ नये, याबाबतचे ठराव महासभेने यापूर्वीच केलेले आहेत. मात्र, महापालिकेत भाजपा सत्तारुढ झाल्यानंतर शहर बससेवा चालविण्याविषयी अनुकूल मते व्यक्त केली जात आहेत. दोन महिन्यांपूर्वीच आयुक्तांनी शहर बससेवा ताब्यात घेण्याबाबत व्यवहार्यता तपासून पाहण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती करण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेत ठेवला होता. सदर प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर निविदा मागविण्यात आल्या होत्या. यावेळी दहा संस्थांनी प्रतिसाद दिला. त्यात क्रिसील या वित्तीय संस्थेचे सर्वात कमी दर आल्याने सदर अहवाल तयार करण्याचे काम क्रिसीलला देण्यात आल्याची माहिती यांत्रिकी विभागाचे कार्यकारी अभियंता शिवाजी चव्हाणके यांनी दिली. सदर संस्थेला अहवाल तयार करण्यासाठी १५ लाख रुपये अदा केले जाणार आहेत. संस्थेने जानेवारी २०१८ अखेरपर्यंत आपला अहवाल महापालिकेला सादर करायचा आहे. त्यामुळे फेबु्वारी २०१८ मध्ये शहर बससेवा ताब्यात घ्यावी किंवा नाही, याबाबतचा फैसला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
महामंडळाचा अल्टीमेटम
शहर बससेवा ताब्यात घेण्याबाबत एसटी महामंडळाने महापालिकेच्या मागे लकडा लावला आहे. आताही विभागीय आगार व्यवस्थापकांनी मार्च २०१८ पर्यंत महापालिकेला डेडलाइन दिली असून त्यानंतर शहर बससेवा महामंडळामार्फत बंद करण्याचा अल्टीमेटम दिला आहे. त्यामुळे, महापालिकेला त्यापूर्वी आपला निर्णय घेणे क्रमप्राप्त ठरणार आहे.