मालेगावमध्ये 33 मनपा कर्मचाऱ्यांवर गुन्हा, प्रशासनाची धडक कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 11:12 AM2020-05-01T11:12:56+5:302020-05-01T11:13:16+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हलगर्जीपणाचा फटका
मालेगाव (नाशिक) :- उत्तर महाराष्ट्रात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मालेगावात महिनाभरापासून कामाला दांडी मारत कर्तव्यात कसूर करणाऱ्या मनपाच्या कंत्राटी ३३ सुरक्षा रक्षकांविरुद्ध येथील किल्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिका प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरात तब्बल 258 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत तर कोरोनाचे 12 बळी गेले आहेत. या पार्श्वभूमीवर स्थानिक व जिल्हास्तरीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उचलबांगडी केली जात आहे.
महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार त्र्यंबक कासार यांनी स्वीकारतात तातडीने आढावा बैठक घेत प्रथम आपल्याच विभागातील कर्मचाऱ्यांची साफसफाई करत कारवाईचा बडगा उगारला आहे. बैठकीत कोविड केअर सेंटर व बाधित रुग्ण ठेवण्यात आलेल्या रुग्णालय परिसरातील सुरक्षेचा विषय घेण्यात आला. यावेळी 33 कंत्राटी सुरक्षारक्षक कामावर येत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली. कासार यांनी कामाला दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांची गंभीर दखल घेत अग्निशमन दल विभागाचे विभाग प्रमुख संजय पवार यांना संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे मनपा वर्तुळात खळबळ उडाली आहे. राष्ट्रीय कर्तव्य कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्याचे संकेत मनपा आयुक्त कासार यांनी दिले आहेत. महानगरपालिकेने कार्यालयीन प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टिकोनातून मोठया प्रमाणावर आऊटसोसींगव्दारे ठोक मानधन तत्वावर नियम अटीशर्तीस अधीन राहून कर्मचारी यांची नेमणुक केलेली आहे. सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार सर्व कर्तव्य बजावणे बंधनकारक आहे. मालेगाव शहरात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असतांनाच सदर कर्मचारी मागील महिन्यापासुन वारंवार आदेश बजावूनही कामावर हजर होत नसल्याने ही कारवाई करण्यात आली.
----
कर्मचाऱ्यांची टाळाटाळ
संपुर्ण देशात कोरोना महामारीस राष्ट्रिय आपत्ती घोषीत करण्यात येऊन आपत्ती व्यवस्थापन व साथरोग प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. शहरात आयुक्त कासार यांना सक्षम प्राधिकारी घोषित केलेले असुन कोरोना प्रादुर्भाव थांबण्यासाठी महापालिकेव्दारे विविध उपाययोजना करण्यात येत आहे. परंतु मनपाच्या विविध विभाग व कार्यालयात कर्तव्यावर असणारा बराचसा कर्मचारी वर्ग या बिकट परिस्थितीत कर्तव्यावर हजर होत नाही. जाणीव पूर्वक कोणतेही सबळ
कारण नसतांना आपल्या कर्तव्यात टाळाटाळ करीत आहे.