मद्यपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा; विद्यार्थिनीला मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:04 AM2019-06-30T00:04:37+5:302019-06-30T00:05:06+5:30
जेलरोड पंचक येथील एका विद्यालयात दारूच्या नशेत असलेल्या शिक्षकाने किरकोळ कारणावरून विद्यार्थिनींच्या हाताच्या बोटांवर छडीने व हाताच्या चापटीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे.
नाशिक : जेलरोड पंचक येथील एका विद्यालयात दारूच्या नशेत असलेल्या शिक्षकाने किरकोळ कारणावरून विद्यार्थिनींच्या हाताच्या बोटांवर छडीने व हाताच्या चापटीने बेदम मारहाण केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. शनिवारी पालकांनी विचारणा करण्यास शाळेत धाव घेतली असता संबंधित शिक्षकाने काढता पाय घेतला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विद्यालयात गेल्या दोन-तीन दिवसांपासून दारूच्या नशेत असलेला संशयित शिक्षक ए. पी. ठाकरे विद्यार्थिनींना मधून भांग का पाडला नाही, इकडे-तिकडे का बघते, रांगेत नीट उभे रहा अशा कारणावरून हाताने व छडीने बेदम मारहाण करत असल्याचे पुढे आले आहे. शनिवारी सकाळी काही पालक विचारणा करण्यास गेले होते. संतप्त पालकांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याबाबत शामसिंग परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, शनिवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास नात अश्विनी ही रडतरडत आॅफिसात येऊन तिने ठाकरे यांनी दारूच्या नशेत प्रार्थनेच्या वेळी रांगेत नीट उभी राहिली नाही या कारणावरून मला व मैत्रिणींना हातावर छडीने जोरात मारले. त्यानंतर वर्गात गेल्यावरदेखील हाताच्या बोटांवर छड्या मारल्या. पूजा राजेंद्र जाधव यांची दहावीतील मुलगी कावेरी, अंजली सुरेश विश्वकर्मा, पूनम करमचंद विश्वकर्मा, मंगल भाऊलाल सोनवणे या विद्यार्थिनींनादेखील मधून भांग का पाडला नाही या कारणावरून दारूच्या नशेत ठाकरे सरांनी छडीने हाताच्या बोटावर मारले. ठाकरे हे गेल्यावर्षी वर्गशिक्षक होते. तेव्हादेखील ते दारू पिऊन विद्यार्थ्यांना छडीने मारत असल्याने तेव्हा मुख्याध्यापकांनी वर्गशिक्षक म्हणून त्यांना काढून टाकले होते. त्या गोष्टीचा राग धरून वर्गात दारू पिऊन येऊन मुलांना छडीने मारतात.