लोकअदालतीत खेळणीतल्या नोटा देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:51 AM2018-12-09T00:51:36+5:302018-12-09T00:51:50+5:30
मालेगाव : तालुक्यातील सायने शिवाराती गट क्रमांक ४४८ मधील जमीन विक्री प्रकरणी दावा येथील लोक न्यायालयात दाखल करण्यात आला होता. शनिवारी झालेल्या लोकअदालतीत १५ लाख रुपये देण्याची तडजोड करून दावा निकाली काढण्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. न्यायालयात ठरलेली १५ लाखांची रक्कम संजय बद्रिनाथ परदेशी व राजेंद्र बद्रिनाथ परदेशी या दोघांनी खेळण्यातल्या खोट्या नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जमीन व्यवहाराच्या तडजोडीसाठी परदेशी बंधूंनी दिलेल्या खेळणीतल्या नोटा.
मालेगाव : तालुक्यातील सायने शिवाराती गट क्रमांक ४४८ मधील जमीन विक्री प्रकरणी दावा येथील लोक न्यायालयात दाखल करण्यात आला होता. शनिवारी झालेल्या लोकअदालतीत १५ लाख रुपये देण्याची तडजोड करून दावा निकाली काढण्याचा निकाल न्यायालयाने दिला होता. न्यायालयात ठरलेली १५ लाखांची रक्कम संजय बद्रिनाथ परदेशी व राजेंद्र बद्रिनाथ परदेशी या दोघांनी खेळण्यातल्या खोट्या नोटा देऊन फसवणूक केल्याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बळीराम हरी पाटील यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पाटील यांच्या शेतजमिनीचा एक कोटी ५ लाख रुपयांना व्यवहार झाला होता. या व्यवहारातील १५ लाख रुपये संजय परदेशी व त्यांचे बंधू राजेंद्र परदेशी यांनी देण्यास टाळाटाळ केली होती. सदरचा दावा न्यायालयात दाखल करण्यात आला होता. शनिवारी झालेल्या लोकअदालतीत दावा तडजोडीसाठी ठेवण्यात आला होता. दोघा पक्षाच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर १५ लाख रुपये देण्याचे न्यायालयासमोर ठरले होते. यानंतर संजय व राजेंद्र परदेशी या दोघांनी त्यांनी आणलेल्या पिशवीतून पैसे पाटील यांना दिले. वकिलांच्या चेंबरमध्ये पिशवीतील पैसे मोजण्यासाठी घेतले असता परदेशी बंधूंनी लघुशंकेच्या नावाखाली पळ काढला. पैसे मोजत असताना परदेशींनी दिलेल्या ५०० च्या नोटा असलेले ३० बंडल लहान मुलांना खेळण्यातल्या दिल्याचे उघडकीस आले. ही बाब वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर झालेला समझोता रद्द करून गुन्हा दाखल करण्याचे सांगितले. बळीराम पाटील यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अहिरे हे करीत आहेत.