विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2020 12:09 AM2020-12-10T00:09:43+5:302020-12-10T00:10:21+5:30
सिन्नर: साडेपाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या विवाहितेस लग्नात मानमान दिला नाही आणि गर्भपात करावा, यासाठी शारीरिक व मानसिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी तालुक्यातील बारागावपिंप्री येथील सासरच्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तिघा संशयिताना अटक करण्यात आली असून, सिन्नर न्यायालयाने त्यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

ऊर्मिला रोशन वाणी (२०, रा. बारागावपिंप्री) असे मृत विवाहितेचे नाव आहे. सोमवारी दुपारी तिने गळफास घेऊन आत्महत्त्या केली होती. त्यानंतर तिची आई कल्पना दत्ता पाटील यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात येऊन सासरच्या पाच जणांविरोधात मुलीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याची फिर्याद दिली. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी सासरच्या पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
ऊर्मिला हिचा २५ जून रोजी नाशिकरोड येथे रोशन वाणी याच्यासोबत विवाह झाला होता. काही दिवसांनी ऊर्मिला माहेरी आल्यानंतर तिने सासू लताबाई व जाव कोमल या टोमणे मारून वाईटसाईट बोलत असल्याने माहेरी सांगितल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तुझ्या आईवडिलांनी लग्नात आम्हाला मानपान दिला नाही, त्यामुळ आमचे नातेवाईक नावे ठेवतात असे वाईटसाईट बोलत असल्याचे सांगितले होते. त्यांनतर माहेरच्यांनी तिला समजून सांगितले. त्यानंतर दोन महिन्यांपूर्वी ऊर्मिला हिचा माहेरी फोन आला तेव्हा तीने गर्भवती असल्याचे सांगितले. तू गर्भवती राहिल्यास घरातील व शेताची कामे कोण करेल, असे बोलून सासू, सासरे, जाव आणि भाया यांनी गर्भपात करावा, यासाठी मानसिक व शारीरिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी विवाहितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीहून सासू लता केरु वाणी, सासरे केरू पांडुरंग वाणी, पती रोशन केरू वाणी, जाव कोमल संदीप वाणी आणि भाया संदीप केरू वाणी या पाच संशयितांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील पती, सासरे व भाया या तिघांना अटक करण्यात येऊन सिन्नर न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक गणेश म्हस्के अधिक तपास करीत आहेत. (०९ उमिर्ला वाणी)