विवाहितेचा छळ करणाऱ्या चौघा जणांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:14 AM2021-04-02T04:14:41+5:302021-04-02T04:14:41+5:30
------ घर बांधण्यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्याविरुद्ध गुन्हा मालेगाव : घर बांधण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक ...
------
घर बांधण्यासाठी विवाहितेचा छळ करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : घर बांधण्यासाठी माहेरून दोन लाख रुपये आणावेत म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह चौघा जणांविरुद्ध पवारवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आफरीन बानो मोबीन खान (रा. अहमदपुरा) या विवाहितेने फिर्याद दिली आहे. पती मोबीन खान जमील खान, जमील खान उर्फ साडीवाला, जुबेदा जमील खान, निकत जमील खान, शहेबाज जमील खान (रा. वडाळा, नाशिक) यांनी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार मोरे हे करीत आहेत.
----
कटरने मारहाण करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : शहरातील सोनिया कॉलनीत किरकोळ कारणावरून शेख मुदस्सिर शेख मुख्तार याला बिलाल (पूर्ण नाव माहीत नाही) व अन्य तिघा जणांनी शिवीगाळ करीत लाकडी दांडक्यांनी व कटरने वार करून जखमी केल्याप्रकरणी आयेशानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुदस्सिर शेख याने फिर्याद दिली आहे. पुढील तपास हवालदार गुळे करीत आहे.
----
दीड लाखाची रोकड लुटणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील सातमाने शिवारातील खासगी कंपनीच्या कर्मचाऱ्याकडून १ लाख ४९ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल लुटून नेणाऱ्या अज्ञात चाैघा जणांविरुद्ध वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नीलेश शंकर दांगडे यांनी फिर्याद दिली आहे. दांगडे महिला बचत गटाच्या वसुलीचे काम करून सातमाने शिवारातून दुचाकी क्रमांक एमएच १९ - डीके ६०५२ वरून परतत असताना रावळगाव येथून सातमाने मार्गे सटाणाकडे जात असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लाल रंगाच्या चारचाकी वाहनातून अज्ञात चार आरोपींपैकी काळा रंगाचा शर्ट व जीन्स पॅण्ट परिधान केलेल्याने दांडगे यांचे तोंड दाबून तसेच अन्य तिघा साथीदारांनी गाडीत बसून गाडी सातमाने गावाकडून अजंग गावाकडे चालवून नेत १ लाख ३९ हजार ३५ रुपये रोकड असलेली बॅग, खिशातील रोकड १० हजार रुपयांचा भ्रमणध्वनी असा १ लाख ४९ हजार ४३५ रुपयांचा मुद्देमाल हिसकावून नेत संशयितांनी रस्त्याकडेला फेकून दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे हे करीत आहेत.
----
किरकोळ कारणावरून मारहाण, दोघा जणांविरुद्ध गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील सावकारवाडी येथे किरकोळ कारणावरून मेंढपाळाच्या मुलाला मारहाण करणाऱ्या भाऊसाहेब फकीरा आवारे, संदीप भाऊसाहेब आवारे या दोघांविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी साहेबराव लाला देवकर (रा. तळवाडे) या मेंढपाळाने फिर्याद दिली आहे. त्यांचा मुलगा किराणा बाजार करीत असताना भाऊसाहेब व संदीप आवारे यांनी किरकोळ कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास हवालदार तिडके करीत आहेत.
----
आयशरची कंटेनरला पाठीमागून धडक; चालक ठार
मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर चिखलओहोळ शिवारात पुढे चालणाऱ्या कंटेनरला पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात पप्पू माताप्रसाद यादव (५१, रा. शेकूर, ता. कुंडा, जि. प्रतापगढ, उत्तर प्रदेश) यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार कैलास गुजर यांनी फिर्याद दिली आहे. पप्पू यादव हे आयशर क्रमांक यूपी ७० - जीटी ६०८३ ने मालेगावकडून धुळ्याकडे जात असताना पाठीमागून कंटेनरला धडक दिली. यात त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास हवालदार गुजर हे करीत आहेत.
-----
अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्याविरुद्ध गुन्हा
मालेगाव : तालुक्यातील शिरसोंडी येथील महाविद्यालय परिसरातून अल्पवयीन मुलीला पळवून नेणारा राजेंद्र पोपट वाघ याच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवून वाघ याने पळवून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील करीत आहेत.