महापौर सतीश कुलकर्णी यांच्याविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2022 01:18 AM2022-03-14T01:18:14+5:302022-03-14T01:18:41+5:30
गोदा काठावरील रामकुंड परिसरात रविवारी (दि.१३) दुपारी ३ वाजता नमामि गोदा व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाबाबत पोलीस प्रशासनाची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती, यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात शहराचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक : गोदा काठावरील रामकुंड परिसरात रविवारी (दि.१३) दुपारी ३ वाजता नमामि गोदा व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाबाबत पोलीस प्रशासनाची कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती, यामुळे पंचवटी पोलीस ठाण्यात शहराचे महापौर सतीश कुलकर्णी यांच्यासह पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांना अटक करण्यात आली आहे.
यशवंत महाराज पटांगणावर नमामि गोदा व पर्यटकांसाठी मार्गदर्शन मदत केंद्र उद्घाटन कार्यक्रम नाशिक महानगरपालिकेचे महापौर सतीश कुलकर्णी व गिरीश पालवे हे आयोजित करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. यानंतर पोलिसांकडून संबंधितांना या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्तालयाची पूर्वपरवानगी घ्यावी यासाठी सीआरपीसी कलम-१४९नुसार शनिवारी (दि.१२) नोटीस बजावण्यात आली होती; मात्र कुलकर्णी व पालवे यांनी नोटीस स्वीकारली नाही, असा दावा पंचवटी पोलिसांकडून करण्यात आला आहे. रविवारी (दि.१३) दुपारी हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ध्वनिक्षेपकाचाही सर्रास वापर केला गेला. यासाठीदेखील सहायक पोलीस आयुक्त यांची पूर्वपरवानगी घेतली गेली नव्हती. कुठलीही परवानगी संयोजकांकडून घेण्यात आलेली नव्हती, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी संशयित सतीश कुलकर्णी, गिरीश रामचंद्र पालवे, नाना शिलेदार, विजय साने, लक्ष्मण सावजी, किरण गायधनी यांच्या विरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात भादंवि कलम१८८ व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम-३३ तसेच कलम १३१ व ३६ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्ह्यातील संशयित गिरीश पालवे यांना पंचवटी पोलीस ठाण्यात आणून अटक करण्यात आली असून, अन्य संशयितांनाही अटक करण्यासह प्रतिबंधात्मक कारवाई सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांनी सांगितले.