जमावबंदीच्या उल्लंघन प्रकरणी मनसे पदाधिकाऱ्यांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:19 AM2021-06-16T04:19:23+5:302021-06-16T04:19:23+5:30
सातपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळोवेळी प्रतिबंधात्मक आदेश पारित करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना ...
सातपूर : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने वेळोवेळी प्रतिबंधात्मक आदेश पारित करून नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले असताना गर्दी जमवून राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करणाऱ्या सातपूरच्या मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन, भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियमान्वये नागरिकांनी गर्दी करू नये, यासाठी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी शहरात जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. असे असतानाही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मनसेचे सातपूर विभागीय अध्यक्ष योगेश ऊर्फ बंटी लभडे यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांसमवेत विनामास्क व सुरक्षित अंतर न ठेवता सोमवारी (दि.१४) रात्री १२ वाजेच्या सुमारास गर्दी जमवून वाढदिवस साजरा केला. त्यामुळे सातपूर पोलिसांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलीस उपायुक्त विजय खरात व सहाय्यक पोलीस आयुक्त सोहेल शेख यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.