शिवपिंडीला रंग दिल्याने अध्यक्षांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2018 01:38 AM2018-08-04T01:38:53+5:302018-08-04T01:38:59+5:30
नाशिक : सोमेश्वर मंदिराच्या शिवपिंडीवरून पेटलेला वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला असून, ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद गोरे यांच्याविरुद्ध भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे याच परिसरात सुशोभिकरण करणाऱ्या मूर्तिकार तांबट यांना रोखण्यात आल्याने आता वाद वाढण्याची शक्यता आहे.
नाशिक : सोमेश्वर मंदिराच्या शिवपिंडीवरून पेटलेला वाद आता पोलीस ठाण्यात पोहोचला असून, ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद गोरे यांच्याविरुद्ध भावना दुखावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे याच परिसरात सुशोभिकरण करणाऱ्या मूर्तिकार तांबट यांना रोखण्यात आल्याने आता वाद वाढण्याची शक्यता आहे.
शहरातील गंगापूररोडवरील ट्रस्टवर नव्याने विश्वस्तांची नियुक्ती झाली असून, त्यातच माजी विश्वस्त आणि काही विद्यमान सदस्य यांच्यातील बेबनाव यानिमित्ताने चव्हाट्यावर आला आहे. सदर ट्रस्टच्या माध्यमातून सुधारणा करण्याच्या नावाखाली अध्यक्ष गोरे यांनी परस्पर कामे सुरू केली असून, त्यातच त्यांनी शिवपिंडीला चक्क आॅइलपेंट केल्याने गुरुवारी (दि. ३) वाद सुरू झाला. यासंदर्भात अरुण धोंडू पाटील यांनी ट्रस्टचे अध्यक्ष प्रमोद बाळकृष्ण गोरे (रा. शिखरेवाडी) यांच्या विरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २ जुलै रोजी सायंकाळी आपण नेहमीप्रमाणे मंदिरात गेलो असता त्याठिकाणी महादेवाची पिंड काळ्या पाषाणाची दिसली नाही. त्यावर रंगकामाच्या वेळी मारली जाणारी पलटी तसेच पिवळसर पांढरा रंग दिसला. त्यासंदर्भात व्यवस्थापक दिनेश भामरे आणि पुजारी पंडित यांना विचारणा केली असता त्यांनी अध्यक्ष कारागिरांना सांगून रंगकाम करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावर प्रमोद गोरे यांना विचारणा केली असता त्यांनी ट्रस्टचे सरचिटणीस बाबूसाहेब गायकर व खजिनदार गोकूळ पाटील यांना विचारणा करून काम करीत असल्याचे सांगितले. यासंदर्भात माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील यांच्यासह अन्य सहकाºयांना बोलविले असता त्यांनीदेखील प्रत्यक्ष पाहणी केली असता धर्मादाय आयुक्त कार्यालयाची परवानगी न घेता परस्पर रंगकाम केल्याचे आढळले. गोरे यांनी परस्पर अशाप्रकारे रंगकाम करून भावना दुखावल्याचा कलम २९५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, श्रावणाच्या पार्श्वभूमीवर सुशोभिकरणाचे काम करणाºया शिल्पकार प्रसन्ना तांबट करीत असताना शुक्रवारी (दि.३) सकाळी माजी अध्यक्ष मुरलीधर पाटील आणि अरुण पाटील यांनी त्यांना रोखल्याची तक्रार तांबट यांनी केली आहे. या प्रकारामुळे ट्रस्टच्या कामावरून तेढ वाढली असून, हा वाद वाढण्याची चिन्हे आहेत.