सोळा वर्षांपासून फरार गुन्हेगारास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 12:17 AM2017-11-06T00:17:13+5:302017-11-06T00:17:19+5:30
देवळाली कॅम्प : बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यात १६ वर्षांपासून फरार असलेल्या पंजाबच्या संशयित आरोपीस पंजाब आणि नाशिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने देवळाली कॅम्प येथून ताब्यात घेतले.
देवळाली कॅम्प : बलात्कार आणि अपहरणाच्या गुन्ह्यात १६ वर्षांपासून फरार असलेल्या पंजाबच्या संशयित आरोपीस पंजाब आणि नाशिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने देवळाली कॅम्प येथून ताब्यात घेतले.
पंजाब येथील होशियारपूर येथील सुखदेव चननसिंग (४५) याच्यावर बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल असून, तो गेल्या १६ वर्षांपासून फरार होता. चननसिंग हा नाशिकजवळील देवळाली कॅम्प भागात गेल्या अनेक वर्षांपासून राहात असल्याने त्याला ताब्यात घेण्यासाठी चंदीगढ न्यायालयाने पंजाब सरकारला विशेष पथक गठित करून चननसिंगला ताब्यात घेण्यासाठी पथक नियुक्त करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पंजाब पोलिसांचे पथक नाशिकला दाखल झाले होते.
या पथकाने नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल आणि पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा दिशा मगर यांना भेटून गुन्ह्याची व आरोपीची माहिती सांगितली असता सिंगल यांनी पंजाब पोलिसांबरोबर युनिट दोनला याबाबत सतर्कतेच्या सूचना दिल्या. सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांच्या टीमने पंजाब पोलिसांबरोबर कॅम्प गाठले.
देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विजय राठोड व कर्मचारी, लहवित गावचे पोलीसपाटील संजय गायकवाड यांच्या मदतीने संयुक्तपणे आरोपीसंदर्भातील माहिती काढून त्याचा देवळाली कॅम्प हद्दीतील व परिसरातील सर्व गुरुद्वारा परिसरात शोध घेतला. सुखदेव चननसिंग हा लहवित गावातील गुरुद्वारा परिसरात आढळल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले व पंजाब पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
सदरची कामगिरी नाशिक शहर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे विजयकुमार मगर, सहायक पोलीस उपआयुक्त परिमंडळ २ श्रीकृष्ण कोकाटे, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अशोक नखाते, उपनिरीक्षक नीलेश माईनकर, सुभाष डवले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे सहायक पोलीस निरीक्षक गंगाधर देवडे, पोलीस उपनिरीक्षक विजय राठोड, कृष्णा चव्हाण विशाल साळुंखे, मोतीलाल महाजन, संजय ताजणे, देवकिसन गायकर, रामदास पाळदे, दत्तू गंधे, मधुकर साबळे तसेच लहवितगावचे पोलीसपाटील संजय गायकवाड उपस्थित होते.