गुन्हे शाखा : घरफोडीतील सराईत गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2019 04:57 PM2019-02-05T16:57:01+5:302019-02-05T17:00:24+5:30
नाशिक : काही महिन्यांपूर्वी शहरात घडलेल्या तीन घरफोडीच्या घटनांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतला संशयित शंकर नागेश पुजारी (रा. शनिमंदीरामागे पेठरोड) ...
नाशिक : काही महिन्यांपूर्वी शहरात घडलेल्या तीन घरफोडीच्या घटनांमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतला संशयित शंकर नागेश पुजारी (रा. शनिमंदीरामागे पेठरोड) याला पोलिसांनी अटक केली होती; मात्र न्यायालयातून त्याला जामीन मंजूर झाला होता. त्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारी कारवाया सुरू केल्यामुळे पोलीस त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्याला गुन्हे शाखेच्या यूनिट-१च्या पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुजारीला ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने मुंबईनाका व ओझरमधील घरफोडीची कबुली दिली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह २लाख १९ हजार १०० रु पयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक आनंदा वाघ हे मुंबईनाका घरफोडीचा समांतर तपास करत होते. दरम्यान, पथकातील कर्मचारी विशाल काठे यांना संशियत पुजारी हा पेठफाटा परिसरात येणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, परिसरात सापळा रचण्यात आला. या सराईत गुन्हेगाराने ओझरमध्येही संशियत गणेश बाजीराव केदारेच्या मदतीने घरफोडी केल्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा (एमएच १५इएच ००६३), मोबाईल, सोन्या-चांदीची दागिने, नाणी असा २ लाख १९ हजाराचा मुद्देमाला पोलिसांनी जप्त केला आहे.
---इन्फो--
अट्टल गुन्हेगार; विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे
संशियत पुजारी व केदार हे अट्टल गुन्हेगार असून गेल्यावर्षी गंगापूर परिसरात केलेल्या घरफोडीप्रकरणी त्यांना आॅगस्ट महिन्यात पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्यावेळी त्यांच्याकडून ६६ हजार रु पयांचा मुद्देमालही जप्त केला होता. तसेच तपासात संशियतांनी सरकारवाडा, उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतही घरफोड्यांसारखे गुन्हे केल्याची कबुली दिली होती. त्यांच्याकडून ४लाख ३३हजार रु पयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला होता. संशियत पुजारी हा काही दिवसांपूर्वीच जामिनावर सुटला होता. त्यानंतर पुन्हा घरफोडी केल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. केदारे हा अद्याप फरार आहे, पोलीस त्याचा शोध घेत आहे.