बारा कांदा व्यापा-यांवर फसवणुकीचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 04:38 PM2018-08-10T16:38:46+5:302018-08-10T16:46:59+5:30
उमराणे : धनादेश न वटल्याने बाजार समितीकडून कारवाई
उमराणे : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत माल विक्री केलेल्या शेतक-यांचे पैसे अद्यापही न दिल्याने बारा व्यापा-यांविरु द्ध देवळा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, फसवणूक झालेल्या शेतक-यांनी जबाब देण्यासाठी देवळा पोलीस ठाण्यांतर्गत उमराणे पोलीस चौकी येथे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
काही महिन्यांपूर्वी उमराणे बाजार समितीत माल विक्री केलेल्या शेतक-यांना त्यांच्या मालाचे पैसे धनादेशाद्वारे चुकते केले जात होते. परंतु या काळात बहुतांश व्यापा-यांकडील धनादेश बॅँकेत न वटल्याने शेतक-यांची फसवणूक झाली. दरम्यान बाजार समिती प्रशासनाने थकबाकीदार व्यापा-यांना वारंवार नोटीसा देऊन शेतक-यांचे पैसे चुकते करण्याचे आदेश दिले होते. त्यास प्रतिसाद देऊन बहुतांश व्यापा-यांनी पैसे चुकते केले आहेत. परंतु बारा व्यापा-यांनी ८३५ शेतक-यांचे ३ कोटी २१ लाख २७ हजार रु पये अद्यापही अदा केले नसल्याने प्रशासक काळात या व्यापा-यांवर देवळा पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्याची शिफारस करण्यात आली होती. त्या अनुषंगाने सदर व्यापा-यांविरोधात फसवणूक व विश्वासघात केल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांकडून आवाहन
नोव्हेंबर २०१७ ते जानेवारी २०१८ या काळात ज्या शेतक-यांनी उमराणे बाजार समितीत माल विकला व सदर व्यापा-याने धनादेश देऊनही तो वटला नसेल,अशा फसवणूक झालेल्या शेतक-यांनी अधिक माहीतीसाठी उमराणे पोलीस चौकीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत कागदपत्रासह समक्ष हजर रहावे,असे आवाहन पोलीसयंत्रणेकडून करण्यात आले आहे.